

पुणे : जागतिक स्तरावर शहरे हवामानबदलाच्या केंद्रस्थानी असून, त्यांचे सर्वाधिक कार्बन उत्सर्जन इमारतींमधून होते. याचा नागरिकांवर आणि पर्यायाने पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होतो. तो कमी करण्यासाठी राज्य हवामान कृती आराखड्याच्या माध्यमातून 'स्टेट कूलिंग अॅक्शन प्लॅन'ची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होऊन पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होईल, असा आशावाद महाराष्ट्र शासनाच्या राज्य हवामान कृती कक्षाचे संचालक डॉ. अभिजित घोरपडे यांनी व्यक्त केला.
भवताल फाउंडेशन आणि मायक्रो इनोटेक यांच्यातर्फे 'हवामानबदलाचे आव्हान पेलायचे कसे?' या विषयावर सहाव्या 'भवताल टॉक'चे आयोजन रविवारी (दि. 29 जून) केले होते. या परिसंवाद डॉ. अभिजित घोरपडे बोलत होते. या वेळी वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल, दुसरे हवामानशास्त्रज्ञ डॉ. विनीत कुमार सिंग, भवताल फाउंडेशनचे संस्थापक संचालक अभिजित घोरपडे, देवानंद लोंढे, मायक्रो इनोटेकचे राजेश पवार उपस्थित होते.
डॉ. कोल म्हणाले, कार्बन वायूंच्या उत्सर्जनाचा वेग झपाट्याने वाढत आहे. यामुळे समुद्राचे तापमान देखील झपाट्याने वाढत आहे. परिणामी, पावसाचा पॅटर्न बदलत असून, अनियमित आणि अनियंत्रित पाऊस पडत आहे. परिणामी, शेतीच्या नुकसानीचे मोठे आव्हान सर्वांसमोर आहे. समुद्रपातळी प्रत्येक दशकाला तीन सेंटिमीटरने वाढल्याने प्रतिदशक समुद्रकिनार्यालगतची 17 मीटर जमीन पाण्याखाली जात आहे. समुद्र आता घरांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. यावर नियंत्रणासाठी कठोर आणि दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे.
डॉ. विनीत सिंह म्हणाले, तापमानवाढीमुळे चक्रीवादळांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तुलनेने शांत असलेल्या अरबी समुद्रातील वादळांची संख्या आणि त्यांचा वेग वाढत आहे. गेल्या 20 वर्षांत चक्रीवादळांची संख्या 50 टक्क्यांनी वाढली असून, वेग ताशी 150 कि. मी. इतका झाला आहे. वादळे कधी तीव्र होतात, तर कधी लवकर निष्क्रिय होतात. वादळाने उग्र रूप धारण केल्यावर पुढील 12 तासांचा अंदाज देण्यासाठीची यंत्रणा अधिक प्रभावी करणे गरजेचे आहे.