Car catches fire at Bopdev Ghat
कोंढवा: पुण्याहून जेजुरीकडे चार प्रवाशांना घेऊन चाललेल्या एका चारचाकीने बोपदेव घाटाच्या वरच्या टप्प्यात अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान दाखवत प्रवाशांना त्वरित उतरवल्याने चारही प्रवाशांचा जीव वाचला.
मंगळवारी सकाळी 9:30 च्या सुमारास एका खासगी कंपनीतील चार जण जेजुरीकडे निघाले होते. बोपदेव घाट ओलांडत अगदी शेवटच्या टप्यात गाडी आली असता, या चारचाकीच्या बोनेटमधून अचानक धूर येऊ लागला. गाडीच्या चालकाने बसलेल्या प्रवाशांना गाडीच्या काचा त्वरित खाली घेण्याच्या सूचना केल्या आणि गाडी बाजूला घेऊन दरवाजा उघडून बाहेर पडण्याच्या सूचना केल्या. सर्वजण गाडीतून त्वरित बाहेर पडले अन् काही क्षणातच संपूर्ण गाडीने पेट घेतला.
...तर अनर्थ घडला असता!
बोपदेव घाटात गेल्या चार दिवसांपासून 22 टन डांबर भरलेला एक डंपर बंद पडला आहे. त्या डंपरपासून आवघ्या सात ते आठ फुटांवर ही चारचाकी गाडी जळत होती. चुकन या डंपरला आग लागली असती, तर संपूर्ण डोंगर परिसरात वणवा पेटला असता. सुदैवाने डंपरला आग लागली नाही. या वेळी घाटामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली होती. कोंढवा वाहतूक शाखेच कॉन्स्टेबल प्रवीण महामुनी आणि इतरांनी वाहतूक कोंडी सोडवली.