शिरूर: आपल्याविरोधात आयकर (इन्कम टॅक्स) कार्यालयात अर्ज दिला, या संशयाने व्यापार्यावर पिस्तूल रोखून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करून धमकी देण्यात आली. या वेळी हवेत गोळीबार देखील करण्यात आला.
यावेळी झालेल्या झटापटीत पिस्तुलातून गोळी सुटली मात्र ती खाली गेल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना सोमवारी (दि. 20) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
महेंद्र बोरा (वय 53) असे फिर्याद दिलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. कृष्णा जोशी (रा. सरदार पेठ, शिरूर, ता. शिरूर) याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आला आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शिरूर शहरातील मध्यवर्ती सरदार पेठ येथील स्विटी प्रोव्हिजन स्टोअर्ससमोर आरोपी कृष्णा जोशी दारूच्या नशेत आला.
तेथे येऊन व्यापारी महेश बोरा यांना आमच्याविरोधात इन्कम टॅक्सला सुमारे चार वर्षांपूर्वी अर्ज केला, असे म्हणत जवळील पिस्तूल बाहेर काढून व्यापारी महेश यांच्या छातीवर रोखून ’मी तुला जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकी दिली. या वेळी हवेत गोळीबार केला तसेच व्यापारी महेंद्र बोरा यांच्याकडे पिस्तुल रोखत त्याचा खटका दाबत असताना व्यापारी महेंद्र बोरा यांनी त्याचा हात तत्परतेने बाजूला ढकलला, त्यामुळे त्याच वेळेस बंदुकीची गोळी खाली झाडल्या गेली. यानंतर तेथून कृष्णा जोशी यांनी महेंद्र बोरा यांना जिवे मारण्याची धमकी देत पलायन केले. या घटनेनंतर व्यापारी महेश बोरा यांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन जिवंत काडतूस जप्त करून पंचनामा केला.
शस्त्र परवान्याबाबत अनभिज्ञता
हा गोळीबार करताना पिस्तूल परवाना होता की नाही, हे स्पष्ट झाले नाही. दरम्यान, शहरात बेकायदा पिस्तुलांचे प्रमाण जास्त आहे. यासंदर्भात दै. ’पुढारी’ने काही दिवसांपूर्वी वृत्त प्रकाशित केले होते. त्यावर या घटनेने शिक्कामोर्तब झाले आहे.
सोमवारीच चाकणमध्ये गोळीबार
दरम्यान चाकण औद्योगिक वसाहती (एमआयडीसी)मधील कैलास स्टील कंपनीच्या मालकावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सोमवारी (दि. 20) भरदिवसा सकाळी 11 वाजेच्या सुमारास गोळीबार केला होता. यामध्ये कंपनी मालकास 2 गोळ्या लागल्या असून, ते गंभीर जखमी झाले आहेत. त्या घटनेची शाई वाळते न वाळते तोच सोमवारी रात्रीच गोळीबाराची ही दुसरी घटना शिरूरमध्ये घडली.