

पुणे: पुणे शहरातील मध्यवर्ती भागात असणार्या वैकुंठ स्मशानभूमीत मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी प्राधान्य दिले जाते. यामुळे या स्मशानभूमीवर ताण वाढण्यासह वायुप्रदूषणात मोठी वाढ होत होती. ते लक्षात घेऊन इतर भागांतील नागरिकांना वैकुंठऐवजी जवळच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठीचे मृत्यूपास देण्यासह विविध उपाययोजना महापालिकेकडून करण्यात आली.
त्यामुळे वैकुंठ स्मशानभूमीतील अंत्यसंस्काराची संख्या मागील तीन-चार महिन्यांत जवळपास 25 टक्क्यांनी घटली आहे. नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे गेल्या तीन -चार महिन्यांत हे उद्दिष्ट साध्य झाल्याची माहिती, अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.
पुणे शहरातील पाच परिमंडळात तब्बल 29 स्मशानभूमी आहेत. शहरात रोज होणार्या एकूण मृतांपैकी 60 ते 70 टक्के अंत्यसंस्कार हे वैकुंठ स्मशानभूमीमध्ये होतात. या स्मशानभूमीत 3 विद्युतदाहिनी व एक गॅसदाहिनी आहे, तर पारंपरिक पद्धतीने मृतदेहांचे दहन करण्यासाठी 25 पेक्षा जास्त कुंड आहेत.
या स्मशानभूमीत पुण्यातील प्रमुख पेठा, कोथरूड, शिवाजीनगर, पर्वती, सिंहगड रस्ता यासह शहरातील विविध भागांतील नागरिक मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी वैकुंठ स्मशानभूमीत येत असतात. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली होती.
त्यामुळे येथील अंत्यसंस्काराची संख्या 25 टक्क्यांनी कमी करण्याचे प्रशासनाने ठरवले होते. त्यानुसार मृतांच्या कुटुंबीयांना त्यांच्याजवळील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी मृत्यूपास देण्यास सुरुवात करण्यात आली. या वेळी नागरिकांना विनंतीदेखील करण्यात येत होती.
प्रशासनाच्या विनंतीला नागरिकांनी सहकार्य करत घराजवळील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास सुरुवात केल्याने गेल्या 3 महिन्यांत वैकुंठ स्मशानभूमीत होणारे अंत्यसंस्कार 25 टक्क्यांनी कमी झाले आहेत. तसेच भविष्यात शहरातील स्मशानभूमींमध्ये गॅसदाहिन्यांसह विविध सुविधा उभारण्यात येणार असे देखील पृथ्वीराज बी. पी. म्हणाले.