

बारामती: रविवारी (दि. 6) बारामती पंचायत समितीत आयोजित एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी वैद्यकीय महाविद्यालयानजीक एका हॉटेलात तरुणाला झालेल्या मारहाणीचा उल्लेख करत गुंडगिरी खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा पुन्हा एकदा दिला.
बारामतीतील एका घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले होते. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. पोलिसांनी याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करूत तिघांना अटक केली आहे. या प्रकरणाची पवार यांनी गंभीर दखल घेत अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांंना सक्त सूचना दिल्या.
पवार म्हणाले, या मारहाणी संदर्भातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये मोटारसायकलवरून आलेल्या चार तरुणांनी हॉटेलमधील एकाला बेदम मारहाण केली. अगदी फुटबॉल खेळासारख्या या तरुणाला लाथांनी उडवले. बेल्टने जबर मारहाण करण्यात आली. याबाबत मी पोलिस प्रशासनाला सक्त सूचना दिल्या आहेत की, अशा प्रकरणात कोणीही असला तरी त्याचा तत्काळ बंदोबस्त करा. असले प्रकार मी खपवून घेणार नाही.
पवार म्हणाले, काहीजण स्वतःच्या घरची प्रॉपर्टी असल्यासारखे एखाद्याला बिनधास्तपणे बेदम मारहाण करतात. असे प्रकार होता कामा नयेत. आपली मुले-मुली काय करतात, कुठे चूक तर होत नाही ना, हे पाहणे पालकांची नैतिक जबाबदारी आहे. ती पालकांनी पार पाडावी, असेही अजित पवार या वेळी म्हणाले.
मी पोलिस प्रशासनाला सक्त सूचना केल्या आहेत की, उद्या अजित पवारांच्या जवळचा कार्यकर्ता असला किंवा त्यांचा मुलगा असला तरी त्यांचा बंदोबस्त करायचा. कोणी गैर वागणार असेल तर त्यांच्यावर कारवाई नक्की होईल. असले प्रकार मी खपवून घेणार नाही, असे पवार म्हणाले.
फोन करणार्यांना लाज वाटायला पाहिजे
बारामतीत एवढी गंभीर मारहाणीची घटना घडली असताना काही जण मला मुंबईला फोन करून दादा चूक पोटात घ्या, असे सांगत आहेत. आता चुका पोटात घेऊन घेऊन पोट फुटायला आले. सांगणार्यांना लाज तरी वाटायला पाहिजे. इतकी बेदम मारहाण झाल्यावर अशा लोकांना कठोर शिक्षाच झाली पाहिजे. त्यांनी यापुढेही असे प्रकार केल्यास त्यांच्यावर मोक्काची कारवाई करावी लागेल, असा इशारा देखील उपमुख्यमंत्री पवार यांनी या वेळी दिला.