

Manchar News: घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे शनिवार, दि. 14 व रविवार दि. 15 डिसेंबर रोजी दत्तजयंती उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीचा थरार रंगणार आहे. सद्गुरू सेवा मंडळ व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गेली 45 वर्षे ही बैलगाडा शर्यत सुरू असून, या वर्षी स्पर्धेचे 46वे वर्ष असल्याचे सद्गुरू सेवा मंडळाचे अध्यक्ष कैलासबुवा काळे यांनी सांगितले.
प्रथम क्रमांकाला 1 लाख 1 हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला 75 हजार रुपये, तृतीय क्रमांकाला 51 हजार रुपये, चतुर्थ क्रमांक 25 हजार रुपये तसेच दोन्ही दिवशी पहिल्यात पहिल्या येणार्या बैलगाड्यास एलईडी टीव्ही, दुसर्यात पहिला येणार्या गाड्यास जुंपता गाडा, तिसर्यात पहिला येणार्या गाड्यास सायकल, चौथ्यात पहिला येणार्या गाड्यास कुलर व घाटाच्या राजास 10 हजार रुपये व चषक, सलग 3 वर्षे प्रथम येणार्या बैलगाड्यास दुचाकी व रोख रक्कम, तिसर्या वर्षाच्या मानकर्यांमध्ये सर्वात आतून येणार्या बैलगाड्यास 11 हजार रुपये विभागून दिले जाणार आहेत.
40 फुटांवरून कांडे प्रथम येणार्यास 11 हजार रुपये, पहिल्यात शेवटी येणार्या बैलगाड्या 4 हजार रुपये अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. घोडेगाव पंचक्रोशीतील सर्व गाडामालक यांच्याकडून दत्तजयंती यात्रोत्सवासाठी 1 लाख 51 हजार रुपयांची देणगी देण्यात येणार आहे.
यात्रेनिमित्त भवानीमाळ, काळेवाडी, धोंडमाळ, शिंदेवाडी, कोळवाडी, कोटमदरा, कोलदरा, घुलेवाडी, दरेकरवाडी, इनामवस्ती, गोनवडी, परांडा, सालोबामळा, घोडेगाव ग्रामस्थ, वसई शेतमालक व श्री मुकाईदेवी नवरात्र उत्सव मंडळ यांचे सहकार्य आहे. तसेच शनिवारी दत्तमंदिरामध्ये दत्तजन्माचे कीर्तन ह.भ.प. तानाजी महाराज सावंत यांचे होणार आहे. तर दत्तमंदिरातील पूजा, आरती व्यवस्था धार्मिक मित्रमंडळ करत असल्याचे सद्गुरू सेवा मंडळाचे अध्यक्ष काळे यांनी सांगितले.