माउलींची पालखी गडाच्या पायथ्याशी नेत देव भेट करा : आ. संजय जगतापांची विनंती

माउलींची पालखी गडाच्या पायथ्याशी नेत देव भेट करा : आ. संजय जगतापांची विनंती

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पूर्वी जेजुरी शहरातून नंदी चौक मार्गे जात गडाच्या पायथ्याशी खंडोबा देवाची भेट घेतली जात होती. कालांतराने हा मार्ग बदलला गेला. या वर्षीपासून पुन्हा पालखी सोहळा जेजुरी गडाच्या पायथामार्गे नेण्यात यावा, अशी विनंती जेजुरीकर ग्रामस्थांच्या वतीने आमदार संजय जगताप यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी यांना केली. या संदर्भात आपण पत्रव्यवहार करणार असल्याचेही आमदार जगताप यांनी या वेळी सांगितले.  संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. 5 जुलै रोजी जेजुरी मुक्कामी विसावणार आहे. या अनुषंगाने वारकर्‍यांच्या सोयीसुविधांबाबतचे नियोजन करण्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदीचे विश्वस्त व पालखी सोहळ्यातील प्रमुखांनी जेजुरी येथील ऐतिहासिक होळकर तलावाकाठी असणार्‍या पालखी तळाची पाहणी केली.

या वेळी आमदार जगताप बोलत होते. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदीचे प्रमुख विश्वस्त अ‍ॅड. राजेंद्र उमाप, पालखी सोहळाप्रमुख योगी निरंजननाथ, पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार राजाभाऊ चोपदार, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, तहसीलदार डॉ. शैलजा पाटील, गटविकास अधिकारी डॉ. अस्मिता पवार, जेजुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले, माजी नगरसेवक हेमंत सोनवणे, महेश दरेकर, जेजुरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. पालखी तळावरील काही भागाचे सपाटीकरण करणे, तळावर पालखी विसावण्यासाठी ओटा बांधणे, अत्यावश्यक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करणे, स्वच्छता, पाणी, आरोग्य, वाहनतळ याबाबत या वेळी चर्चा करण्यात आली, तर गुरुवारी (दि. 18) चैत्रवारी बैठकीत याविषयी चर्चा करण्यात येईल, असे विश्वस्त मंडळाने सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news