

पुणे: पुण्यातील जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात लाचखोरीचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. ठेकेदाराने केलेल्या कामाची पाहणी करून त्याचा अहवाल देण्यापासून ते कामाचे बिल मंजूर करण्यापर्यंत कनिष्ठ ते वरिष्ठ स्तरावरील अधिकार्यांनी लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
झेडपीच्या कार्यकारी अभियंत्यासह उपअभियंता आणि अभियंता महिलेने एकूण 2 लाख 54 हजारांची लाच मागितली. तडजोडीअंती यातील 1 लाख 42 हजारांची लाच घेताना दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) रंगेहाथ पकडले.
याप्रकरणी महिला अधिकार्यासह तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर भ-ष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बाबूराव कृष्णा पवार (वय 57, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग (दक्षिण) जिल्हा परिषद, पुणे), दत्तात्रय भगवानराव पठारे (वय 55, उपअभियंता, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, उपविभाग दौंड शिरूर), अंजली प्रमोद बगाडे (कनिष्ठ अभियंता, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, उपविभाग दौंड) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत 37 वर्षीय ठेकेदाराने फिर्याद दिली आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे शासकीय ठेकेदार असून, त्यांच्या फर्मच्या नावाने शासकीय टेंडर घेत असतात. कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग यांनी दौंड तालुक्यातील खुटबाव रोड ते गलांडवाडी पाणंद शीव रस्ता व गलांडवाडी मंदिर ते ज्ञानदेव कदम घर रस्ता या कामाचे टेंडर सप्टेंबर 2024 मध्ये प्रसिद्ध केले होते. तक्रारदार यांना या दोन कामांची वर्कऑर्डर मिळाली होती.
या कामाच्या रकमेमध्ये जीएसटी व इतर कर अशी दोन्ही कामांच्या बिलाची रक्कम 40 लाख रुपये होत आहे. ही कामे केल्यानंतर तक्रारदार यांनी 3 मार्च 2025 रोजी कनिष्ठ अभियंता अंजली बगाडे यांनी तक्रारदारांनी केलेल्या कामाच्या ठिकाणी जाऊन पुणे जिल्हा परिषदेकडील एसक्यूएम कमिटी केलेल्या कामाची पाहणी करून अहवाल देईल.
त्यासाठी या कमिटीकरिता प्रत्येक कामापोटी सात हजार रुपये असे दोन कामांकरिता 14 हजार रुपयांची लाच मागितली. तसेच, तक्रारदारांच्या दोन कामांच्या बिलाची फाईल तयार करून मंजुरीसाठी ऑनलाइन सादर करण्यासाठी कामाच्या बिलाच्या रकमेच्या दोन टक्के प्रमाणे 80 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
त्यानंतर तक्रारदार हे दत्तात्रेय पठारे यांना भेटले असता त्यांनी तक्रारदाराकडे दोन कामांच्या बिलांची फाईल तपासून ती फाईल वरिष्ठ अधिकारी कार्यकारी अभियंता बाबूराव पवार यांच्याकडे पाठविण्यासाठी कामाच्या बिलाच्या रकमेच्या दोन टक्के याप्रमाणे म्हणजे 80 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार हे बाबूराव पवार यांना भेटले असता त्यांनीसुद्धा तक्रारदाराकडे दोन कामांच्या बिलांची फाईल मंजूर करण्याकरिता व बिल देण्याकरिता कामाच्या बिलाच्या रकमेच्या दोन टक्के याप्रमाणे 80 हजार रुपये लाच मागितली.
त्याची तक्रारदार याने 10 मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीच्या अनुषंगाने 11 मार्च रोजी या तिघांकडे पंचांसमक्ष लाच मागणी पडताळणी केली. त्यात अंजली बगाडे यांनी 14 हजार रुपये तसेच दत्तात्रेय पठारे यांनी बिलाची फाईल तपासणी करून वरिष्ठांकडे मंजुरीसाठी पाठविण्याकरिता तडजोडीअंती 64 हजार रुपये लाचेची मागणी केली. बाबूराव पवार यानेही तडजोडीअंती 64 हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या कार्यालयात सापळा रचण्यात आला.
बाबूराव पवार यांनी तक्रारदाराकडून त्यांच्या कामाच्या बिलाची फाईल मंजूर करून बिल काढण्यासाठी 64 हजार रुपये स्वीकारले. त्यानंतर अंजली बगाडे यांनी आपल्याला देण्यात येणारे 14 हजार रुपये दत्तात्रेय पठारे याच्याकडे देण्यास सांगितले. तक्रारदाराकडून स्वत: मागणी केलेले 64 हजार रुपये आणि अंजली बगाडे हिने मागणी केलेले 14 हजार रुपये असे 78 हजार रुपये स्वीकारताना त्या दोघांना पकडण्यात आले.
बंडगार्डन पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक रूपेश जाधव तपास करत आहेत.
कार्यालयात सापडले 8 लाख 58 हजार 400 रुपये
ठेकेदाराने केलेल्या कामाची पाहणी करून त्याचा अहवाल देण्यापासून ते कामाचे बिल मंजूर करण्यासाठी लाच मागितल्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेला कार्यकारी अभियंता बाबूराव पवार याच्या कार्यालयातील एका बॅगेत 8 लाख 58 हजार 400 रुपयांची रोख रक्कम मिळाली असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ती जप्त केली आहे.