

प्रज्ञा केळकर-सिंग
Pune News: भारतात दर 25 ते 30 महिलांमध्ये एकीला स्तनांचा कर्करोग होण्याचा धोका असतो. कर्करोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास अल्ट्रासाउंड गाइडेड सर्जरी, ऑन्कोप्लास्टिक पद्धती वापरून अचूकपणे कॅन्सरग्रस्त भाग काढला जातो.
यामध्ये स्तनांचा आकार आणि सौंदर्य शाबूत राखणे शक्य असते. त्यामुळे कर्करोगाचे निदान झाल्यास निराश न होता त्वरेने उपचार करून घ्यावेत, असा सल्ला स्त्रीरोगतज्ज्ञांनी दिला आहे.
काहीवेळा पूर्ण स्तनाचा भाग काढणे आवश्यक असते. अशा वेळी बरेस्ट रिकन्स्ट्रक्शनद्वारे स्तनाची पुनरर्चना कॅन्सर ऑपेरेशनच्या वेळीच केली जाते. उपचारांमध्ये रेडिएशन थेरपीची गरज भासल्यास आधुनिक रेडिएशन उपकरणे वापरल्याने अपाय देखील नाहीसे होत आहेत. ( Pune Health News)
टार्गेटेड थेरपी, इंडोक्राइन थेरपी, इम्युनोथेरपी अशा औषधांमुळे उपचार अधिक प्रभावी करण्यास मदत होत आहे. यामुळे कॅन्सर (Cancer) उपचारांविषयी भीती मनात बाळगू नये, असे मत बरेस्ट सर्जन डॉ. प्रांजली गाडगीळ यांनी व्यक्त केले.
स्तनांच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी डिजिटल मॅमोग्राफी, सोनोग्राफी, बायोप्सी आणि आवश्यक असल्यास पेट सी-टी आणि जेनेटिक टेस्टिंग अशा तपासण्या करून घेतल्या जातात. महिलेचे वय, कॅन्सरचा प्रकार, त्याची स्टेज, जेनेटिक रिपोट्स यावरून उपचाराची योजना आखली जाते. कॅन्सरची गाठ मोठी असेल तर केमोथेरपीसारखे औषधोपचार करता येऊ शकतात. काही रुग्णांमध्ये जिनोमिक तपासण्यांची मदत घेऊन केमोथेरपी टाळणे देखील शक्य होते.