

पुणे : गुलेन बॅरी सिंड्रोम या आजारावरील उपचारांसाठी रुग्णांना लाखो रुपयांचा खर्च येत आहे. त्यामुळे विमा नसलेल्या रुग्णांना एक लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला होता. शहरी गरीब योजनेतील 12 रुग्णांना 24 लाखांची, तर शहरी गरीब योजनेत बसत नसलेल्या 25 रुग्णांना प्रत्येकी एक लाख रुपयांप्रमाणे 25 लाखांची मदत करण्यात आली. जीबीएसची साथ आटोक्यात येत असल्याने या मदतीला तूर्तास ’ब्रेक’ लावण्याचा निर्णय महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून घेतला आहे.
जीबीएसवरील उपचारांसाठी आयव्हीआयजी इंजेक्शन आणि प्लाझ्मा फेरेसिसचे उपचार दिले जात आहेत. या उपचारांसाठी पाच ते आठ लाख रुपये खर्च येतो. गेल्या महिनाभरात शहरातील सिंहगड रस्ता परिसरात जीबीएसचा उद्रेक झाला. अशा परिस्थितीत रुग्णांना आर्थिक हातभार लावण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे नागरिकांना एक लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता 1 मार्चपासून ही मदतीची योजना बंद केली जाणार आहे. आता जीबीएसची साथ आटोक्यात आली आहे. त्यामुळे मदत थांबविण्याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे.
शहरात जीबीएसच्या 102 रुग्णांना आत्तापर्यंत महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळाले आहेत. त्यापैकी सर्वाधिक 46 रुग्णांना ससून रुग्णालयात लाभ मिळाला आहे. जीबीएसवरील उपचारांसाठी लाखो रुपयांचा खर्च येत असल्याने 102 गरजू रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळाल्याची माहिती योजनेचे समन्वयक डॉ. प्रीती लोखंडे व डॉ. वैभव गायकवाड यांनी दिली.