दारूच्या बिलावरून सोरतापवाडीत राडा

alcohol संग्रहित फोटो
alcohol संग्रहित फोटो

उरुळी कांचन : पुढारी वृत्तसेवा : दारूचे बिल मागितल्याच्या कारणावरून सहा जणांनी लोखंडी पाईपने हॉटेलमालक व कामगाराला बेदम मारहाण करून हॉटेल, तसेच वाहनांची मोडतोड करण्याचा प्रकार सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतील अभिराज हॉटेलमध्ये घडला. विशेष म्हणजे या प्रकरणातील काही संशयितांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या (शहर) हद्दीत आठ दिवसांपूर्वी बेदम मारहाण करण्याचा प्रकार केला होता.

स्वप्निल चौधरी, यश संपत चैधरी (दोघेही रा. वडाचीवाडी पेठ, ता. हवेली), यश (पूर्ण नाव माहीत नाही), नंदू ऊर्फ हनुमंत चोरगे, शिवम शिवरकर (दोघेही रा. म्हातोबाची आळंदी, ता. हवेली) आणि उत्कर्ष बाबर (रा. सोरतापवाडी कडवस्ती, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी मोहन वासू गौड (वय 43, रा. हॉटेल अभिराज, नायगाव फाटा, सोरतापवाडी ता. हवेली, मूळ रा. महाराज बिल्डींग ब्रम्हनगर, ता. माझगाव, जि. बेळगाव, रा. कर्नाटक) यांनी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

वाहने फोडून मालकाला मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दारूचे बिल मागितल्याच्या कारणावरून स्वप्नील चौधरी व नंदु उर्फ हनुमंत चोरगे यांनी हॉटेल व्यवस्थापक गौड व मालक महेश पोपट चौधरी यांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांनी लोखंडी पाईपने मारहाण करीत दमदाटी केली. या वेळी शटरवर दगडफेक केल्याने त्यातील दगड हॉटेलमधील कामगार बबलु अन्सारी यास लागल्याने तो जखमी झाला. यावर हल्लेखोर न थांबता त्यांनी बारच्या खिडकीची काच फोडून नुकसान केले, तसेच आय 20 कार व फॉर्च्युनर कारवर दगडाने हल्ला केला तसेच यामाहा मोटारसायकलने डॅश देऊन नुकसान केले. मोहन गौड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वरील सहा जणांवर उरुळी कांचन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांचा दरारा संपला की काय?

नुकताच या प्रकरणातील संशयितांनी कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन चौकातील हॉटेल आशीर्वादच्या शेजारी दहा दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून लाथा-बुक्क्यांनी तसेच दगड व विटाच्या सहाय्याने तिघांना बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी याच संशयितांवर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात (शहर) गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गंभीर गुन्हाला आठ दिवस नाही उलट तोच त्यांनी आणखी एक गुन्हा केल्याने शहर व ग्रामीण पोलिसांचा दरारा संपला की काय असा सवाल नागरिक करीत आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news