

रात्रीची वेळ...आईच्या मागे येणारा मुलगा..इतक्यात बिबट्याने झडप मारली अन् आईच्या डोळ्यासमोरुन चिमुकल्याला बिबटयाने उचलून नेले...या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना शिरूर तालूक्यातील मांडवगण फराटा येथे घडली.
वन्स सिंग (वय.७) असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. तर झालेल्या घटनेने परिसर सुन्न झाला आहे. याबाबत सविस्तरअसे की, मांडवगण फराटा येथील दगडवाडी रोड, गोकुळनगर येथे संदीप अशोक घाडगे यांचे उसाचे गुऱ्हाळ आहे. या गुऱ्हाळवर राजकुमार नथू सिंग हे कुटुंबासमवेत कामाला आहेत.
राजकुमार सिंग व त्यांची पत्नी रेखा यांच्यात शुक्रवारी घरी असतानाच घरगुती कारणावरून किरकोळ वाद सुरू होता. रात्रीच्या वेळी आई पुढे चालत असताना मागून त्यांचा वन्स हा मुलगा येत होता.आईने मागे येणाऱ्या मुलाचा रडण्याचा आवाज ऐकला असता त्यावेळी त्यांना बिबट्या निदर्शनास आला. यावेळी बिबट्याने आईच्या डोळ्यासमोरच चिमुकल्यावर हल्ला करत उसाच्या शेतात फरफटत नेले.
त्यानंतर आईने मोठ्याने आरडाओरडा केला. यावेळी उपस्थित असणाऱ्या गुऱ्हाळ कामगार, उसतोड कामगार व उपस्थित असणाऱ्यांनी शोध घ्यायचा प्रयत्न सुरु केला. दरम्यान पोलीस व वनविभागाला ही कळविण्यात आले. रात्री उशिरा चिमुकल्याला गंभीर जखमी अवस्थेत शोधण्यात यश आले. रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले मात्र उपचारापूर्वीच मुलाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान मांडवगण फराटा परिसरात उसाचे क्षेत्र मोठे आहे.अनेक ठिकाणी उसाची तोड सुरू आहे. सातत्याने बिबट्या हा नागरिकांना निदर्शनास येतो मात्र त्यावर ठोस उपाययोजना केल्या जात नाही. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. याबाबत गुऱ्हाळचालक संदीप अशोक घाडगे यांनी पोलिसात माहिती दिली आहे.