Pune News: पानशेत रस्त्यावरील मालखेड (ता. हवेली) येथील ओढ्यालगतच्या खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात रविवारी (दि.27) सकाळी दहाच्या सुमारास वेंकटेश्वर हॅचरीच कंपनीतील बेपत्ता सुरक्षारक्षकाचा मृतदेह सापडला.
प्रसनजित इंद्रजित सिन्हा (वय 38, सध्या रा. वरदाडे, ता. हवेली, मूळ रा. आसाम) मृताचे नाव आहे. वरदाडे गावच्या स्मशानभूमी शेजारील ओढ्यालगत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात प्रसन्नजित याचा मृतदेह तरंगताना स्थानिक शेतकर्यांनी पाहिला.
याबाबतची माहिती मिळताच हवेली पोलिसांनी मावळा जवान संघटनेचे तानाजी भोसले यांच्यासह रेस्क्यू पथकाचे सागर बावळे, पोलिस हवालदार अशोक तारु आदींनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बाहेर काढल्यानंतर सायंकाळी शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला.
प्रसन्नजित हा रक्षक सिक्युरिटी कंपनीमार्फत वेंकटेश्वर हॅचरीच कंपनीत कंत्राटी पद्धतीने सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करत होता. त्याला दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत तो धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडला असावा अथवा त्याने आत्महत्या केली असावी, असा संशय हवेली पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलीस हवालदार संतोष तोडकर म्हणाले, शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच प्रसन्नजित याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. याबाबत सखोल चौकशी सुरू आहे. दरम्यान, प्रसन्नजित हा पाच दिवसांपासून बेपत्ता होता. चार ते पाच दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे त्याचा मृतदेह सडू लागला होता असे पोलिसांनी सांगितले. पोलिस हवालदार संतोष तोडकर तपास करत आहेत.