घटना उद्ध्वस्त करण्याचा भाजपचा होता प्लॅन : शरद पवार

खराडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मेळावा
sharad pawar
शरद पवार Pudhari File Photo
Published on
Updated on

लोकसभा निवडणुकीत भाजपने चारशेपारचा दावा केल्यामुळे महाविकास आघाडीचे नेते चिंतेत होते. चारशे जागा नेमक्या कशासाठी पाहिजेत? याचा विचार केल्यावर समजले की, घटनेची चौकट उद्ध्वस्त करण्याचा त्यांचा प्लॅन होता. त्यामुळे आम्ही इंडिया आघाडी बनवली आणि लोकसभा निवडणुकीत राज्यात 31 जागा जिंकून दाखवल्या, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

खराडी येथील पठारे इनडोअर स्टेडियममध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शुक्रवारी महानिर्धार मेळाव्याचे आयोजन केले होते, त्या वेळी ते बोलत होते. माजी आमदार बापूसाहेब पठारे आणि सुरेंद्र पठारे यांच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन केले होते. आमदार अशोक पवार, रोहित पवार, पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, खासदार वंदना चव्हाण, पक्षाचे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आशिष माने, माजी आमदार जयदेव गायकवाड, माजी नगरसेवक महेंद्र पठारे, शैलेश राजगुरू आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी माजी नगरसेवकांसह इतर पक्षांतील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

शरद पवार म्हणाले की, चुकीच्या गोष्टीला पाठिंबा देणे चुकीचे आहे. पोर्शे कार अपघातातील जखमींना मदत करायची सोडून येथील आमदाराने पोलिस स्टेशनला जाऊन पोलिसांवर दबाव आणला आणि अपघातातील आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न केला. तरुण व्यसनाच्या आहारी जात असताना येथील ‘आमदार दमदार’ असल्याचे बोर्ड लावत आहेत. पोर्शे कार प्रकरणात या आमदाराचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले. यामुळे या आमदाराचा काय निकाल लावायचा आहे, ते जनतेने ठरवावे, अशी टीका शरद पवार यांनी नाव न घेता स्थानिक आमदारांवर केली. बापूसाहेब पठारे यांनी आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीत केलेल्या विकासकामांचा आढावा भाषणातून घेतला. ते म्हणाले, ‘या भागात आयटी पार्क उभे राहिल्यामुळे युवकांना रोजगार मिळू शकला आहे. यापुढे काम करून पुणे महापालिकेत शरद पवार यांच्या विचाराची सत्ता आणू.’ रोहित पवार, प्रशांत जगताप यांनीही मनोगत व्यक्त केले. सुरेंद्र पठारे यांनी स्वागत केले.

राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. राज्यात महिला आणि मुलींवर होणारे वाढते आत्याचार पाहता आज त्यांना पैशाऐवजी संरक्षणाची खरी गरज आहे.

शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news