.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
इंदापूर: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्या पुणे जिल्ह्यातच मोठा राजकीय धक्का बसला आहे. बारामती शेजारच्या इंदापूर तालुक्यातच मोठ्या राजकीय भूकंपाची घोषणा आज झाली. 'सोनाई'चे संचालक प्रवीण माने पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा पुणे जिल्ह्यात अजित पवारांना मोठा धक्का मानला जात आहे.
अजित पवार यांच्या पक्षातील पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती आणि राजकारणातील युवा नेतृत्व सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण दशरथ माने हे शनिवारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकत शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.
इंदापूर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून प्रवीण माने यांच्या नावाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती आणि विधानसभेचा शब्द शरद पवारांनी माने कुटुंबाला दिला असावा त्यामुळेच त्यांनी पुन्हा 'युटर्न' घेतला अशी सूत्रांची माहिती असून यानंतरच हा पक्षप्रवेश निश्चित झाला आहे. पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात शरद पवारांच्या उपस्थितीत उद्या हा पक्ष प्रवेश होणार आहे.
लोकसभेच्या निवडणुकी वेळी माने यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेत घड्याळ पेक्षा तुतारी बरी असे म्हणत प्रचाराला सुरुवातही केली होती,मात्र याच दरम्यान अचानक माने यांनी सुळे यांची साथ सोडत अजित पवार गट राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या उपस्थितीत 'मी अजित दादा बरोबरच आहे' असे स्पष्ट केले होते.
यावेळी मानेंवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासह भाजपचा मोठा दबाव असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापुरात घेतलेल्या मेळाव्याला आले असताना भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगोदर माने यांच्या घरी जाऊन चर्चा केली होती.
मात्र आता हेच प्रवीण माने अजित पवारांच्या घड्याळाची साथ सोडत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार आहेत त्यामुळे इंदापूरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान इंदापुरात शरद पवार गटाकडून इंदापूर विधानसभेसाठी चाचपणी सुरू आहे.यात पुणे जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक आणि बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांचे ही नाव शर्यतीत आहे. त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवार गटात मोठ्या ताकतीनिशी जाहीर प्रवेश केला होता.शरद पवार इंदापूर विधानसभेसाठी आप्पासाहेब जगदाळे आणि प्रवीण माने दोघांपैकी कोणावर शिक्कामोर्तब करणार हे अद्याप तरी गुलदस्तात आहे.
इंदापूर विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तगडा उमेदवार दिल्यास इंदापूर मध्ये राजकारणाची गणित बदलणार असून सध्या परिस्थितीत इंदापूर मध्ये तिरंगी लढत होईल असे चित्र आहे. एकीकडे शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रवीण माने यांच्या नावाची चर्चा असून दुसरीकडे हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी तालुका विकास आघाडी स्थापन करत अपक्षाची तयारी केली आहे, तर अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे पुन्हा एकदा इच्छुक आहेत.