शिरूर लोकसभेत अजित पवारांना मोठा धक्का; शरद पवार, ठाकरेंबद्दल सहानुभूतीची लाट!

शिरूर लोकसभेत अजित पवारांना मोठा धक्का; शरद पवार, ठाकरेंबद्दल सहानुभूतीची लाट!

[author title="सुषमा नेहरकर शिंदे" image="http://"][/author]

शिवनेरी : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वाधिक ताकद असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पराभवाचा मोठा धक्का बसला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा 1 लाख 49 हजार 938 मतांनी पराभव करत दुसर्‍यांदा खासदार होण्याचा मान मिळविला. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मिळालेल्या प्रचंड सहानुभूतीवर कोल्हे यांचा विजय सोपा झाला.

निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष!

राज्यातील राजकीय घडामोडीनंतर प्रथमच होत असलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. राज्यातील 'हाय व्होल्टेज' मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणून शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे पाहिले जात होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिरूरचे आमदार सोडले, तर चारही आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गट अजित पवार यांच्यासोबत राहिला.

शरद पवार यांनी त्यानंतर येथील आमदारांना जाहीर आव्हान दिले होते. यामुळेदेखील अजित पवार आणि शरद पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. अजित पवार यांनी 'कोल्हे निवडून कसा येतो तेच पाहतो', असे खुले आव्हान दिले होते. अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे देखील डॉ. कोल्हे यांना सहानुभूती मिळाली.

पक्षात नाराजी, प्रचारातील विस्कळीतपणा!

शिरूर लोकसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाचा उमेदवार उभा करायचा याचाच निर्णय अनेक दिवस होऊ शकला नाही. अजित पवार यांचे चार-चार आमदार असून देखील पवारांना शिरूर लोकसभेत स्वतःच्या पक्षाचा सक्षम उमेदवार मिळू शकला नाही. अखेरच्या क्षणी महायुतीचे शिंदे गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन उमेदवारी जाहीर करण्यात आली. उमेदवारीचा घोळ, आढळराव पाटील यांच्या उमेदवारीवरून आमदारांची नाराजी, निवडणूक प्रचारातील विस्कळीतपणा व नियोजनाचा अभाव, कार्यकर्त्यांनी अलिप्त राहण्याची घेतलेली भूमिका यामुळे अजित पवार यांनी मोठ्या प्रमाणात सभा घेऊनदेखील आढळराव पाटील यांचा पराभव झाला.

पवार आणि ठकरेंबद्दल जनतेत सहानुभूति!

दुसरीकडे डॉ. कोल्हे यांची उमेदवारी निश्चित असल्याने प्रचारामध्ये घेतलेली सुरुवातीपासूनची आघाडी विजयी होईपर्यंत कायम ठेवली. शरद पवार व शिवसेना (उबाठा) यांना जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यात प्रचंड सहानुभूती मिळाली. डॉ. कोल्हे यांच्याकडे पुरेशी निवडणूक यंत्रणा नसताना देखील तळागाळातील कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन मनापासून केलेले काम, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारविषयी असलेली नाराजी, कांद्याचा प्रश्न, दूध व शेतीमालाची कवडीमोल किंमत, बिबट्यांचा विषय असे शेतकर्‍यांचे प्रश्न लावून धरल्याने कोल्हे यांचा विजय सोपा झाला.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news