माळशिरस: पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथील जागृत देवस्थान श्रीक्षेत्र भुलेश्वर येथे श्रावण महिन्यातील तिसर्या सोमवारनिमित्त हजारो भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले. यानिमित्त शिवलिंगाची आकर्षक पूजा करण्यात आली होती.
सोमवारी पहाटे शिवलिंगास दही, दूध व पंचामृताने अंघोळ घालण्यात आली. त्यानंतर महाआरती करण्यात आली. माळशिरस ग्रामस्थांच्या वतीने पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांनी सपत्नीक पूजा केली. (Latest Pune News)
या वेळी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, नंदकुमार कामठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय कोलते, माजी आमदार अशोक टेकवडे, अजिंक्य टेकवडे, माळशिरसच्या सरपंच आरती यादव, उपसरपंच सविता गद्रे, माजी सरपंच अरुण यादव, एकनाथ तात्या यादव, माजी उपसरपंच माऊली यादव, ह.भ.प. लक्ष्मण महाराज यादव, ग्रामसेवक विलास बडधे उपस्थित होते.
दुपारी बारा वाजता मंदिराच्या पायथ्याला असणार्या पाण्याच्या कुंडापाशी भुलेश्वरास ग्रामस्थांच्या उपस्थितीत अंघोळ घालण्यात आली. त्यानंतर कावड तसेच पालखी मिरवणूक काढण्यात आली. दुपारी तीन वाजता मंदिराच्या प्रवेशद्वारावर मानाच्या कावडींची धार घालण्यात आली. त्यानंतर पालखीची महाआरती करण्यात आली. गाव छबिन्याने प्रदक्षिणा घालण्यात आली.
जेजुरी पोलिस ठाण्याच्याव तीने पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्यसेवा देण्यात आली. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात आला होता. माळशिरस ग्रामपंचायतीच्या वतीने पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. दिवसभरात अनेक भाविकांनी अन्नदान केले. शिवलिंगाची फुलांची सजावट व मंदिर सजावट जीवन खेडेकर तळेगाव ढमढेरे यांच्या वतीने करण्यात आली.