कडूस: मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे परिसरातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जुना लोखंडी पूल कोसळून पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना खेड तालुक्यातील चासकमान धरण परिसरातील भीमा नदीवर असणार्या पुलाला अनेक दिवसांपासून भगदाड पडले आहे.
त्यामुळे या पुलावर दुर्घटना घडण्याची शक्यता बळावली आहे. पावसाळ्यात चासकमान धरण परिसरात निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी हजारो पर्यटक भेट देत असतात. हा पूल धरणाच्या सांडव्याच्या समोरील बाजूला भीमा नदीवर आहे. (Latest Pune News)
या पुलावरून पर्यटक सांडव्यामधून वहाणारे पाणी पहात असतात. चासकमान धरणाच्या खाली चास-कमान धरणाच्या भिंतीला समांतर असणार्या भीमा नदीवरील पुलाला विविध ठिकाणी भगदाड पडून हा पूल वाहतुकीस धोकादायक झाला आहे.
तरीही या पुलावरून वाहतूक सुरूच आहे. त्यामुळे हा पूल मौत का कुवाँ बनला आहे. यापूर्वीही पुलावर विविध ठिकाणी 7 ते 8 वेळा भगदाड पडल्याने पुलावरून होणारी वाहतूक धोकादायक बनली आहे. मात्र धरण प्रशासन याबाबत डोळ्यावर पट्टी बांधून आहे.
प्रशासन अपघाताची वाट पाहतेय का?
पुलाच्या निर्मितीनंतर यावर कोणत्याही प्रकारचे काम न केल्याने पुलावर खड्डे पडले व त्यानंतर आता पुन्हा भगदाड पडले आहे. जवळपास 4 फूट बाय 7 फूट आकाराचे हे भगदाड पडल्याने आतील स्टील बाहेर आले आहे. काँक्रीटसाठी वापरलेले खडी, वाळू व सिमेंटचे प्रमाण पाहता हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे स्पष्ट होत आहे.
पुलाचे रेलिंगही तुटलेले आहे. वारंवार तक्रार करूनही प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. एखादा मोठा अपघात होऊन पुलावरून वाहन कोसळल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? तसेच दुर्दैवाने अपघातात कोणी मृत्युमुखी पडल्यास प्रशासनावर गुन्हे दाखल होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
पुलाच्या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह
चासकमान धरणाच्या पलीकडील वेताळे, सायगाव, कहू, कोयाळी, साकुर्डी, चिखलगाव, कळमोडी यांसह अनेक गावांकडे जाण्यासाठी धरणाला लागूनच सुमारे 17 ते 18 वर्षांपूर्वी भव्य पुलाची निर्मिती करण्यात आली. मात्र, या पुलाचे काम व दर्जाबाबत प्रश्नचिन्ह आहे. पुलावर भगदाड पडल्यानंतर प्रत्येक वेळेस तत्कालीन अधिकार्यांनी हे भगदाड तात्पुरत्या स्वरूपात बुजवून पुलावरील संपूर्ण भागावर नव्याने काँक्रिटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती देत हा विषय लांबवला.
संबंधित पूल आमच्या अखत्यारीत येत नाही. या पुलाबाबत आम्ही शिक्रापूर येथील पाटबंधारे उपविभाग कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला आहे.
- एस. एस. सुसंद्रे, सहायक अभियंता श्रेणी 2, चासकमान धरण प्रकल्प
यासंदर्भात कार्यकारी अभियंता ठरवतील तसे होईल. पुलाचे ऑडिट करावे लागणार आहे. त्याचा अहवाल येईपर्यंत वाहतुकीसाठी हा पूल बंद करावा लागणार आहे. कार्यकारी अभियंत्यांच्या आदेशानुसार काम केले जाईल.
- अजय वाघमोडे, उपअभियंता, चासकमान धरण प्रकल्प शिक्रापूर