

भिगवण: इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भिगवण येथील धान्य उपबाजारात वर्षानुवर्षे कसल्याच सुविधा मिळत नसल्याने संतापलेल्या व्यापारी व अडतदारांनी रविवारी (दि. 26) धान्य उतरविण्यास असमर्थता दाखवली. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेकडो टन माल वाहनांमध्ये पडून राहिला. उघड्यावर धान्याचा बाजार कुठे भरतो का? 30 वर्षे झाली, तीन पिढ्या गेल्या तरी आश्वासनापलीकडे काही मिळाले नाही. शौचालयाची सोय नाही, पाण्यासाठी भीक मागावी लागते असा संताप व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. (Latest Pune News)
याबाबत अधिक माहिती अशी की, भिगवण येथील उपबाजारात रविवारी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मकासह इतर धान्य विक्रीसाठी आणले होते. अडतदारांनी सकाळपासूनच माल उतरून घेण्यास नकार दिला. याची माहिती मिळताच सभापती तुषार जाधव, सचिव संतोष देवकर यांनी भिगवणचा उपबजार गाठला.
या वेळी अडतदारांनी सभापती जाधव यांच्यासमोर बाजार समितीच्या आवारातील गैरसोयींचा पाढा वाचला. मुळात वर्षोनुवर्षे धान्य बाजार हा उघड्यावर भरवला जातो त्यामुळे पावसाळ्यात धान्याचे भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान होते. गैरसोयींबद्दल गेली 30 वर्षांपासून आम्ही मागणी करीत आहोत. परंतु, दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोप केला. धान्य खरेदी सुरू करतो पण धान्य भिजले तर याची जबाबदारी कोण घेणार? असाही सवाल अडतदारांनी केला.
यावर सभापती जाधव यांनी उपबाजारात सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. तातडीने तात्पुरती शेडची सुविधा उपलब्ध करून देऊ. मात्र थोडा अवधी द्यावा. अधिकच्या सुविधा देऊ. सध्या धान्य खरेदी करावे असे सांगितले. मात्र, व्यापाऱ्यांनी धान्य उतरून घेतले नाही.
दरम्यान, संतापलेल्या शेतकऱ्यांनी बाजार समिती व अडतदार एकच आहेत. त्यांना शेतकऱ्यांना मारायचे आहे अशा संतप्त भावना व्यक्त केल्या. बाजार बंद ठेवायचा होता तर आधी सांगायचे होते, विनाकारण गाडी भाडे, पिशव्यामागे खर्च झाला. भिगवणच्या बाजारात माल आणू नका अशी तीव प्रतिक्रिया व्यक्त केली.
बंदला संशयाची किनार
भिगवण उपबाजारात सध्या नव्या मकेची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. मकेच्या प्रतीनुसार 1700 ते 2300 प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. मात्र, तालुक्यातील व बाहेरच्या मका खरेदी करणाऱ्या कंपन्यानी मकेला सतराशे रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव काढला. इकडे मकेची खरेदी अधिकच्या भावाने असल्याने प्रतिक्विंटलमागे 300 ते 500 रुपयांचा तोटा कोणी सहन करायचा असा प्रश्न उपस्थित झाला.
याची देखील बंदला किनार असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात होते.