पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पोलिस भरतीप्रक्रिया निष्पक्ष, तटस्थ आणि पारदर्शी पद्धतीने पार पडणार आहे. केवळ गुणवत्तेच्या आधारे पोलिस दलात भरती होता येणार आहे. त्यामुळे भरतीसाठी आलेल्या तरुणांनी दलालांपासून सावध रहावे; तसेच भूलथापा आणि अफवांना बळी पडू नये, असे आवाहन पिंपरी-चिंचवडचे अपर पोलिस आयुक्त डॉ. वसंत परदेशी यांनी 'पुढारी'च्या माध्यमातून केले आहे.
पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलातील 262 शिपाई पदासाठी भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शिपाई पदासाठी एकूण पंधरा हजार जणांनी अर्ज दाखल आहेत. बुधवार (दि. 19) पासून भोसरीतील इंद्रायणीनगर मैदानावर प्रत्यक्ष भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली. आयुक्तालयाच्या स्थापनेनंतर सात वर्षांनी प्रथमच शहरात पोलिस भरती होत असल्याने शहरवासीयांसाठी हा एक नवीन अनुभव आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस दलात भरतीसाठी राज्याच्या कानाकोपर्यातून तरुण शहरात दाखल झाले आहेत.
पोलिस बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून आलेले तरुण ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता मिळेल त्या ठिकाणी आसरा घेत आहेत. भरतीसाठी आलेल्या तरुणांमध्ये मराठवाड्यातील तरुणांची संख्या लक्षणीय आहे. सामान्य कुटुंबातून आलेल्या या तरुणांची कोणतीही फसवणूक होऊ नये, यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी सर्वोतोपरी काळजी घेताना दिसत आहेत.
याबाबत अपर पोलिस आयुक्त डॉ. वसंत परदेशी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पोलिस भरतीप्रक्रिया अतिशय पारदर्शी पद्धतीने सुरू आहे. तरुणांनीदेखील स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवावा. भूलथापा व अफवांवर विश्वास ठेवू नये. केवळ गुणवत्तेच्या आधारे पोलिस दलात भरती होणे शक्य असल्याचे उमेदवारांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.
पोलिस भरती प्रक्रियासंबंधीत कोणी आमिष दाखवत असेल, अफवा पसरवत असेल, दलाली, वशिलेबाजी करीत असल्यास वरिष्ठ अधिकार्यांशी किंवा सूचना फलकावर देण्यात आलेले दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीची शहानिशा करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
शारीरिक चाचणीदरम्यान अनेक उमेदवारांना दुखापत होते. अशा वेळी वेळेत वैद्यकीय मदत मिळणे गरजेचे असते. या बाबींचा विचार करून भोसरी येथील इंद्रायणीनगर मैदानावर रुग्णवाहिकेसह वैद्यकीय अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
भरतीप्रक्रियेसाठी स्थानिक पोलिस, गुन्हे शाखा, विशेष शाखा यांचे अधिकारी व अंमलदार नियुक्त करण्यात आले आहेत. भरतीप्रक्रिया सुरू असताना अधिकारी व अंमलदार यांना मोबाईल वापरास बंदी घालण्यात आली होती. ज्यामुळे भरतीप्रक्रियेत आतमध्ये असलेल्या पोलिसांना बाहेरील व्यक्तींशी संपर्क करणे शक्य झाले नाही.
पोलिस भरतीच्या पहिल्या दिवशी 500 जणांना बोलवण्यात आले होते. यातील 281 जण मैदानी चाचणीसाठी हजर राहिले. मैदानी चाचणीसाठी 225 जण पात्र ठरले. तर, इतर 56 जण अपात्र ठरले.
भरतीसाठी शहरात दाखल झालेले उमेदवारांची राहण्याची गैरसोय होते. मागील पोलिस भरतीच्या वेळीदेखील पुणे शहर परिसरात उमेदवार इतरत्र आसरा घेत असल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर या वेळी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी उमेदवारांची भोसरी येथील बाल क्रीडा संकुलात राहण्याची व्यवस्था केली आहे. या ठिकाणी तैनात असलेले पोलिस पडताळणी करूनच संकुलात प्रवेश दिला जात आहेत.
हेही वाचा