पुणे : पुढारी वृत्तसेवा : नवीन कोरोना विषाणूच्या केपी 2 या उपप्रकाराचे सर्वाधिक 51 रुग्ण पुणे जिल्ह्यात आढळून आले आहेत. कोरोनाचा नवा उपप्रकार हा जेएन-1 व्हेरियंटचा उपप्रकार असल्याचे वैद्यकतज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्याच्या रुग्णांच्या नमुन्यांचे जीनोम सिक्वेन्सिंग केले असता 70 टक्के नमुने केपी.2 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. नवीन उपप्रकाराचा संसर्ग 8 फेब्रु वारी रोजी पुण्यात संकलित केलेल्या रुग्णाच्या नमुन्यांमध्ये आढळून आला. त्यानंतर 15 फेब्रुवारी रोजी ठाणे येथून गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये आढळून आला. आत्तापर्यंत महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांमध्ये या व्हेरियंटचे 91 रुग्ण आढळून आले. कोरोना विषाणूच्या आधीच्या लक्षणांप्रमाणेच खोकला, ताप, थकवा आणि अपचन, अशी लक्षणे सध्या आढळून येत आहेत.
इन्साकॉगचे महाराष्ट्र समन्वयक डॉ. राजेश कार्यकर्ते म्हणाले की, नवीन व्हेरियंटचा प्रसार जलद असून, यापूर्वी कोरोना विषाणूच्या संसर्गाविरुद्ध प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांनाही संक्रमण होऊ शकते. केपी.2 हा जेएन.1 ची जागा झपाट्याने घेत आहे. सध्या हा संसर्ग राज्यात प्रबळ आहे. महाराष्ट्रात केपी.2 व्हेरियंटचे पुण्यात 51, ठाण्यात 20, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये अनुक्रमे सात रुग्ण नोंदविले गेले. जेएन.1 प्रमाणे केपी.2 च्या प्रसाराचा वेग जास्त असला तरी संसर्ग सौम्य आहे. गंभीर लक्षणे दिसत नसल्याने बहुतांश रुग्णांची कोरोना चाचणी होण्याची शक्यता नसते. संसर्गाच्या सौम्य स्वरूपामुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे.
हेही वाचा