

पुणे: यंदा मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून तापमानाचा पारा चढल्यामुळे कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. त्यामुळे उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यताही वाढली आहे. उष्माघाताचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे उष्णतेपासून सर्व नागरिकांनी स्वत:चे संरक्षण करण्याचे आवाहन सहसंचालक डॉ. बबिता कमलापूरकर यांनी केले आहे.
दिवसभरात भरपूर पाणी प्यावे, ताज्या फळांचा रस, लिंबूपाणी, ताक, कोकम सरबत यांचा आहारात समावेश करावा, हलके आणि सैलसर पांढर्या किंवा हलक्या रंगांचे, सुती व आरामदायक कपडे परिधान करावे, शक्यतो सावलीच्या ठिकाणी राहा, उन्हात जाताना टोपी, स्कार्फ किंवा छत्री वापरा, फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करा, दिवसातून 2 वेळा अंघोळ करा, कामाच्या वेळा उष्णतेच्या तीव्रतेनुसार ठरवा, अशी काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे.
काय टाळावे?
सकाळी 11 ते संध्याकाळी 4 दरम्यान घराबाहेर जाणे टाळा.
गडद रंगाचे आणि जाड कपडे घालू नका. काळ्या किंवा गडद रंगाचे कपडे उष्णता शोषतात.
अतिश्रम करू नका. विशेषतः दुपारच्या वेळी शारीरिक श्रमाची कामे टाळा.
कोल्ड्रिंक्स, सोडा किंवा अल्कोहोलयुक्त पेय टाळा. कारण ते शरीरातील पाणी कमी करतात.
भूक लागली नाही म्हणून जेवण वगळू नका. हलका आहार घेत राहा.
वाहनात लहान मुले किंवा पाळीव प्राणी सोडून जाऊ नका. बंद गाडीत तापमान झपाट्याने वाढू शकते.
लहान मुले, वृद्ध नागरिक, गर्भवती आणि स्तनदा माता, जास्त शारीरिक श्रम करणार्या व्यक्ती, शेतकरी, बांधकाम कामगार, रस्त्यांवर काम करणारे लोक इत्यादींना उष्णतेचा धोका अधिक असतो. त्यांनी आरोग्याची हेळसांड टाळावी.
पूर्वीपासूनच मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, किडनीचे आजार असणार्यांनी विशेष काळजी घ्यावी.
सुरक्षितता कशी राखावी?
लहान मुलांना आणि वृद्धांना भरपूर पाणी पिण्यास प्रवृत्त करा.
गरोदर महिलांनी उन्हात जाणे टाळावे आणि हलका आहार घ्यावा. घराबाहेर काम करणार्यांनी अधूनमधून विश्रांती घ्यावी आणि शक्यतो सावलीत काम करावे.
जास्त घाम येत असेल तर ओआरएस, साखर-मीठ पाणी किंवा ताक प्यावे.
आजारी व्यक्तींनी गरमीच्या लाटेच्या काळात अधिक सावधगिरी बाळगावी आणि गरज असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
उष्णतेचा त्रास झाल्यास रुग्णाला सावलीत ठेवा आणि गार पाणी द्या. रुग्णाला झोपवून, त्याचे डोके आणि पाय उचलून ठेवा.
लक्षणे गंभीर वाटल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
शरीराचे तापमान कमी होण्याकरिता बर्फ किंवा गार पाण्याच्या पट्ट्या शरीरावर ठेवा.
आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजना
प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यावरील सर्व आरोग्य संस्थांमध्ये उष्णतेशी संबंधित आपत्कालीन उपचारांसाठी विशेष कक्ष उभारण्यात आले आहेत.
गरमीच्या लाटेबद्दल नागरिकांना सतर्क करणार्या सूचना वेळोवेळी देण्यात येतात.
राज्यस्तरावरून सर्व जिल्हा व मनपास्तरावरील साथरोग वैद्यकीय अधिकारी यांचे उष्माघातविषयक प्रशिक्षण घेण्यात आले आहे.