

Baramati News: बारामतीतील मतदारांनी विधानसभेला अजित पवार यांना दिलेल्या मताधिक्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. बारामतीकर हेच अजित पवार यांचे कुटुंब असल्याचे या निकालाने अधोरेखित झाल्याची प्रतिक्रिया खा. सुनेत्रा पवार यांनी दिली.
अजित पवार यांच्या विजयानंतर बोलताना त्या म्हणाल्या, बारामतीचा मतदारराजा हुशार आहे. इथे अजित पवार यांनी विकासकामे केली आहेत. त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम प्रत्येकाच्या आयुष्यात झाल्याचे आपण पाहतो आहोत. त्यामुळे विधानसभेला येथील मतदार अजित पवार यांच्याच मागे उभे राहणार, हे निश्चित होते.
बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ’भावी मुख्यमंत्री’ असे बॅनर लागले आहेत, त्यासंबंधी त्या म्हणाल्या, प्रत्येक कार्यकर्त्याला आपला नेता मोठ्या पदावर जावा, अशी अपेक्षा असते. कार्यकर्त्यांच्या या मतामध्ये काही गैर नाही.
...हे फक्त बारामतीकरच करू शकतात
उपमुख्यमंत्री अजित पवार हे विधानसभेला मोठ्या मताधिक्याने विजयी झाले, याचा खूप आनंद आहे. बारामतीकर शरद पवार यांच्यावरही प्रेम करतात, करत राहतील. लोकसभेवेळी त्यांनी ते दाखवून दिले होते. पण, अजितदादांवर ते तितकेच प्रेम करतात, हे या निवडणुकीने दाखवून दिले, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांच्या भगिनी विजया पाटील यांनी व्यक्त केली.
मला राजकीय विषयावर बोलायचे नाही. शरद पवार हे माझ्यासाठी कायमच आदरणीय राहिले आहेत, असेही त्या म्हणाल्या. शिवाय आम्ही लोकसभेला सुप्रिया सुळे, तर विधानसभेला अजितदादा यांचे काम करायचे ठरविले होते, असेही त्यांनी सांगितले.