

सुपे : बारामती तालुक्यातील देऊळगाव रसाळ अंतर्गत रसाळवाडी क्रमांक एक येथे जुन्या विहिरीचे खोदकाम सुरू असताना विहिरीची कडा कोसळून चुलत्या-पुतण्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि. १८) सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत अन्य एक जण किरकोळ जखमी झाला आहे. अमोल धनाजी रसाळ (वय २६) आणि मच्छिंद्र रामचंद्र रसाळ (वय ५०, दोघेही रा. रसाळवाडी क्र. १) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रसाळवाडी क्रमांक एक येथे सुमारे ३० वर्षांपूर्वीची जुनी विहीर असून, तिचे नव्याने खोदकाम सुरू करण्यात आले होते. पोकलेनच्या साहाय्याने विहिरीचे खोदकाम सुरू असताना विहिरीतील पाणी बाहेर काढण्यासाठी अमोल आणि मच्छिंद्र हे दोघे विद्युत पंप घेऊन विहिरीत उतरले होते. याचवेळी अचानक विहिरीचा वरील कड्याचा मोठा भाग कोसळला व या दोघांच्या अंगावर पडला.
या दुर्घटनेत गंभीररीत्या अडकल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर दोघांना विहिरीतून बाहेर काढून बारामती येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. या दुर्घटनेत अन्य एक जण किरकोळ जखमी झाला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच महसूल विभागातील तलाठी आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व घटनेची माहिती घेतली.