बारामती: पोलिस प्रशासन आणि वाहतुकीच्या नियमांना धाब्यावर बसवून सुरू असलेल्या खासगी अवैध वाहतुकीला आता बारामतीच्या वाहतूक पोलिसांनी दणका दिला. चार प्रवासी वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्यावर न्यायालयात खटले पाठविल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.
बारामती बसस्थानक परिसरात सुरू असलेल्या अवैध प्रवासी वाहनांवर कारवाई केली असून, त्यामध्ये एकूण चार वाहनांचा समावेश आहे. अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलिस निरीक्षक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती बसस्थानक परिसरात वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे.
वाहतूक नियमांना आणि महिला सुरक्षेला प्राधान्य देत हे पाऊल टाकण्यात आले आहे. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे वाहतूक नियमांची पायमल्ली होते. प्रमाणापेक्षा अधिक प्रवासी बसवून त्यांच्या जीवितास धोका निर्माण होतो. अनेकवेळा अपघात घडतात त्यानंतर कायदेशीररीत्या भरपाई मिळण्यास अनेक अडचणी निर्माण होतात.
रस्ता सुरक्षा, पार्किंग, नायलॉन दोरीचा प्रयोग, फॅन्सी नंबर, फटाका सायलेंसर, रेसिंग कार, पार्किंगसाठी प्रयत्न, वाहन परवाना, ट्रिपल सीट आदी कारवायानंतर आता खासगी अवैध वाहतुकीला चाप बसविण्यासाठी बारामती वाहतूक पोलिस प्रयत्न करत आहेत. या कारवाईला 2 हजार ते 5 हजार रुपये दंडाची तरतूद आहे. त्यामुळे यापुढेही कारवाईचा बडगा सुरूच राहणार असल्याचे यादव यांनी सांगितले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक यादव, अंमलदार सुभाष काळे, सुधाकर जाधव, प्रदीप काळे, अशोक झगडे, सीमा साबळे, रूपाली जमदाडे आदींनी केली.