

बारामती: तुझ्या पती व मुलाला जीवे मारून टाकीन तसेच तुझे व्हिडिअो व्हायरल करेन अशी धमकी देत विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना बारामती तालुक्यातील थोपटेवाडी येथे घडली. वडगाव निंबाळकर पोलिसांनी या प्रकरणी अक्षय अजित तावरे (रा. थोपटेवाडी, कोऱहाळे बुद्रूक, ता. बारामती) याला अटक केली.
या प्रकरणी पिडीत महिलेने वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तावरे याने या महिलेच्या संमतीशिवाय तिच्याशी वारंवार जबरदस्तीने शारिरिक संबंध ठेवले. याबाबत कोणाला काही सांगितल्यास तुझ्या मुलाला व पतीला जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली.
तसेच शारिरिक संबंधाचे व्हिडीअो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर २ एप्रिल रोजी रात्री १०.४५ वाजता ते ४ नोव्हेंबर २०२६ पर्यंत थोपटेवाडी येथे दोन वेगवेगळ्या घरांमध्ये तिच्या संमतीशिवाय वेळोवेळी जबरदस्तीने शारिरिक संबंध प्रस्थापित केले.
पोलिसांनी तावरे याच्या विरोधात शारिरिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. वडगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अझर मुलाणी अधिक तपास करत आहेत.