बारामती न.प.च्या नगररचना विभागाच्या ऑपरेटर पासून ते नगररचनाकारपर्यंत सगळेच भ्रष्टाचाराच्या चिखलात

भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला
pune news
बारामती न.प.Pudhari
Published on
Updated on

बारामती : बारामती नगरपरिषदेत नगररचनाकार विकास किसनराव ढेकळे (वय ५०) यांना लाच प्रकरणी अटक करण्यात आली. शहर पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यानिमित्ताने या विभागाला भ्रष्टाचाराची कीड लागली असल्याचे समोर आले असून अनेक सुरस कथा आता बाहेर येवू लागल्या आहेत.

शहरातील बांधकाम व्यावसायिक भगवान चौधर यांच्या गृह प्रकल्पाचा प्रस्ताव नगरपरिषदेच्या नगररचना विभागात दाखल होता,तो प्रस्ताव मंजूर होण्यासाठी ढेकळे यांनी दोन लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती १ लाख ७५ हजार रुपये द्या अशी मागणी ढेकळे यांनी केली. त्यातील १ लाख रुपयांचा पहिला हप्ता लाच स्वरुपात घेताना त्यांना बुधवारी (दि. १९) रात्री ताब्यात घेत अटक करण्यात आली.

या विभागात अगदी शिपायापासून ते ऑनलाईन काम करणाऱ्या एजन्सीचे ऑपरेटर, ते थेट नगररचनाकार अशी भ्रष्टाचाराची मोठी साखळीच कार्यरत असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त रात्री हाॅटेलात अनेकदा व्यवहार ठरवले जातात. गृह प्रकल्प असो कि व्यावसायिक प्रकल्प त्याच्या मंजूरीसाठी लाच दिल्याशिवाय सहीच होत नसल्याचे चित्र बारामतीत आहे. एजंटांचा विळखा या विभागाला पडला आहे.

शहरातील दोन मोठे एजंट कोणतेही अडचणीचे काम बिनबोभाट करून देत आहेत. त्यामुळे नगरपरिषदेसह प्रशासकीय भवनातील अन्य कार्यालयातही या एजंटांचा मोठा बोलबाला सध्या आहे. या एजंटांनी सांगितल्याशिवाय प्रकरण पुढे सरकत नाही. ऑनलाईन मंजूरी दिली जात असल्याचे फक्त नावाला सांगितले जाते. प्रत्यक्षात काही दिल्याशिवाय प्रकरणच पुढे सरकत नाही. सहा वर्षांपूर्वी पुण्यातील एका व्यक्तीने या विभागातील प्रत्येकाला महागडे आय फोन मोबाईल गिफ्ट केले होते. दिवाळी तसेच आर्थिक वर्षाच्या अखेरीस या विभागाला मिळणाऱ्या गिफ्टस डोळे पांढरे करणाऱ्या असतात. आता लाचेचे बाहेर आलेले प्रकरण हे हिमनगाचे एक टोक असल्याचे बांधकाम व्यावसायिक सांगत आहेत.

अधिकारी झाले मालक

बारामती नगरपरिषदेच्या कारभारावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारकाईने लक्ष असते. पवार यांच्यामुळे कोट्यवधींचा निधी पालिकेला विकासकामांसाठी मिळतो. पवार यांनी वारंवार सूचना केल्यानंतरही अधिकारी स्तरावर अडवाअडवीची कामे चालतात. पैसे दिल्याशिवाय कामेच होत नसल्याचा अनुभव नागरिकांना येतो आहे. काही वर्षांपूर्वी एका जाहीर कार्य़क्रमात पालखी महामार्ग भूसंपादन मोबदल्यापोटी प्रांताधिकारी पैसे मागत असल्याची तक्रार एका शेतकऱ्याने पवार यांच्याकडे केली होती. गेल्या दोन महिन्यांपूर्वी पंचायत समितीचा एक अधिकारी पैसे घेतल्याशिवाय विहिरींच्या कामांना परवानगी देत नाही, अशी तक्रार पवार यांच्याकडे केली होती. त्यावर पवार यांनी आमची भावकीच पैसे घेतेय. त्यांनी चुकीचे काम केले असल्यास गैर नाही, असा इशारा दिला होता. त्यानंतरही बारामतीत विविध विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वागण्यात तसूभरही बदल झालेला नाही.

अधिकाऱ्यांच्या मनमानीचा त्रास: 'क्रेडाई'बारामतीचे निवेदन

बारामती नगरपरिषदेला मिळणाऱ्या महसूलापैकी मोठा वाटा हा बांधकाम परवानगीच्या माध्यमातून जमा होत असतो. बारामती शहराच्या विकासामध्ये बांधकाम व्यावसायिकांचा मोलाचा वाटा आहे. नगररचना विभागातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा प्रचंड त्रास बारामतीमधील सर्व बांधकाम व्यावसायिकांना मागील काही वर्षांपासून होत आहे. ही बाब मुख्याधिकाऱ्यांच्या कानावर 'क्रेडाई'ने वेळोवेळी घातली आहे.विकास ढेकळे यांच्यावरील कारवाईचे बारामती 'क्रेडाई'ने स्वागत केले असून आता तरी या विभागातील कार्यतत्परता व कार्यक्षमता वाढवावी अशी मागणी 'क्रेडाई'ने केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news