

बारामती : बारामती एमआयडीसी परिसरात शनिवारी (दि. २१) सायंकाळी अज्ञात हल्लेखोरांनी एका उद्योजकाच्या गाडीवर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शिवशंभो नगर परिसरात राहणारे उद्योजक राजन कोळेकर यांच्या घराच्या परिसरात येऊन अज्ञात व्यक्तींनी दोन राउंड फायर केले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नसून मोठा अनर्थ टळला आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बारामती एमआयडीसी भागातील शिवशंभो नगर येथे उद्योजक राजन कोळेकर यांचे निवासस्थान आहे. शनिवारी दुपारी राजन कोळेकर यांना इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अज्ञात व्यक्तींनी कॉल केला होता. या कॉलद्वारे त्यांच्याकडे काही रकमेची खंडणी मागण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
त्यानंतर सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घराजवळ येत गाडीवर दोन राऊंड गोळीबार केला. या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसून जीवितहानी टळली आहे. गोळीबाराच्या आवाजामुळे परिसरात काही काळ घबराट आणि खळबळ उडाली होती. गोळीबाराची घटना घडली तेव्हा नेमके कोण गाडीत होते किंवा कोळेकर घटनास्थळी उपस्थित होते का, तसेच या हल्ल्यामागे नेमका काय हेतू होता, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान बारामती तालुका पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून तपास सुरू आहे. गोळीबार करणारे अज्ञात व्यक्ती कोण, त्यांचा उद्देश काय आणि खंडणीच्या धमकीशी या घटनेचा संबंध आहे का, याचा पोलीस तपास करीत आहेत.