

बारामती: पावसाळा हा शेतीसाठी नवसंजीवनी देणारा ऋतू असला, तरी याच काळात वीज अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. शेतातील विद्युत पंप, ओलसर वातावरण, पाण्याने भरलेली शिवारे, तुटलेल्या वीजवाहिन्या, वादळी वाऱ्यामुळे पडलेल्या झाडांच्या फांद्या तसेच वीज कोसळण्याच्या घटनांमुळे शेतकरी आणि वीजग्राहकांनी विशेष सतर्कता बाळगणे आवश्यक असल्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
पावसाळ्यात पाणी हे विद्युत प्रवाहाचे उत्तम वाहक ठरत असल्याने शेतातील पंप सुरू करताना किंवा दुरुस्ती करताना अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे. ओल्या हाताने स्विच, प्लग किंवा विद्युत उपकरणांना स्पर्श करू नये. पाण्यात उभे राहून विद्युत उपकरणांचा वापर करणे टाळावे. शेतातील विद्युत पंप, केबल, स्विच आणि घरातील वायरिंगची वेळोवेळी तपासणी करून आवश्यक दुरुस्ती परवानाधारक विद्युत तंत्रज्ञामार्फत करून घ्यावी. योग्य अर्थिंग असल्यास विद्युत धक्का बसण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.
शेतकरी तसेच नागरिकांनी घ्यावयाची काळजी
तुटलेल्या वीजवाहिन्यांपासून दूर राहा : रस्त्यावर किंवा शेतात तुटलेली वीजवाहिनी
दिसल्यास तिच्या जवळ जाऊ नका किंवा स्पर्श करू नका. इतरांनाही दूर ठेवा आणि त्वरित महावितरणला माहिती द्या.
ओल्या हाताने विद्युत उपकरणांना स्पर्श करू नका : ओल्या हाताने स्विच, प्लग किंवा कोणतेही विद्युत उपकरण चालवू नका. ओल्या जमिनीवर उभे राहून विद्युत उपकरणांचा वापर करणे टाळा.
घरातील वायरिंगची तपासणी करा : जुनी, सैल किंवा खराब झालेली वायरिंग, प्लग, स्विच व एमसीबी यांची वेळोवेळी तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करून घ्या. परवानाधारक विद्युत तंत्रज्ञाचीच मदत घ्या.
योग्य अर्थिंग असणे आवश्यक : घरातील विद्युत यंत्रणेला योग्य अर्थिंग असल्यास विद्युत धक्का बसण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.
पाणी साचलेल्या ठिकाणी विशेष काळजी घ्या : वीजखांब, ट्रान्सफॉर्मर, वितरणपेटी किंवा स्ट्रीट लाइटजवळ पाणी साचले असल्यास त्या परिसरात जाणे टाळा.
मुलांवर लक्ष ठेवा : लहान मुलांना पावसात वीजखांब, ट्रान्सफॉर्मर किंवा विद्युत उपकरणांजवळ खेळू देऊ नका. त्यांना विद्युत सुरक्षिततेबाबत माहिती द्या.
वादळी पावसात दक्षता : जोरदार वादळ किंवा विजांच्या कडकडाटावेळी शक्यतो घरातच राहा. उघड्या जागेत किंवा एकट्या झाडाखाली उभे राहणे टाळा.
धोकादायक परिस्थितीची त्वरित माहिती द्या : स्पार्किंग, तुटलेली वीजवाहिनी, झुकलेला वीजखांब, ट्रान्सफॉर्मरमधील बिघाड किंवा इतर कोणतीही धोकादायक बाब दिसल्यास त्वरित महावितरणच्या कार्यालयाशी किंवा ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधा.
महावितरणची पूर्वतयारी
पावसाळ्यापूर्वी महावितरणकडून वीजवितरण यंत्रणेची तपासणी, वीजवाहिन्यांलगतच्या झाडांच्या फांद्यांची छाटणी, ट्रान्सफॉर्मर व विद्युत उपकरणांची देखभाल, दोषग्रस्त साहित्याची बदली आणि आपत्कालीन पथकांची नियुक्ती करण्यात येते. मात्र, ग्राहकांचे सहकार्य आणि जागरूकता ही देखील तितकीच महत्त्वाची आहे.
सुरक्षिततेसाठी सामूहिक जबाबदारी
वीज ही विकासाची ऊर्जा असली तरी तिचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने विद्युत सुरक्षिततेचे नियम पाळल्यास अपघात टाळता येतील आणि पावसाळा सुरक्षित व आनंददायी ठरेल. तुटलेली वीजवाहिनी, स्पार्किंग किंवा इतर कोणतीही विद्युत धोक्याची बाब आढळल्यास तत्काळ महावितरणला कळवा.
आपल्या एका फोनमुळे एखाद्याचा अमूल्य जीव वाचू शकतो. शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांना महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राचे १९१२ वा १९१२० वा १८००-२१२-३४३५ वा १८००-२३३-३४३५ या २४ तास सेवेत असलेल्या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन बारामती परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे यांनी केले आहे.