

प्रा. अनिल धुमाळ
शिवनगर : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगतं नेतृत्व आणि बारामतीचा बुलंद आवाज अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर तीन महिने झाले तरी बारामती शहर आणि परिसर आजही त्या धक्क्यातून सावरलेला नाही. ज्या बारामतीने दशकानुदशके 'दादां'चा शब्द प्रमाण मानला, ती बारामती आज खऱ्या अर्थाने पोरकी झाली असून, शहरात एक प्रकारची 'सैरभैर' शांतता असून राजकीय अराजकता निर्माण झाली आहे,तर गुन्हेगारी उसळून वर आली आहे.
अजितदादांच्या निधनानंतर बारामतीच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. जरी सुनेत्रा पवार तसेच पार्थ आणि जय पवार या वारशाचा गाडा ओढण्याचा प्रयत्न करत असले, तरी दादांचा तो दरारा आणि प्रशासनावर असलेली पकड आता हरवलेली दिसते. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीने राजकीय चढाओढ समोर आणली असली, तरी कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारची दिशाहीनता जाणवत आहे. आता कोणाकडे बघायचं? हा प्रश्न सामान्यांपासून ते बड्या नेत्यांपर्यंत सर्वांना सतावत आहे.
दादा असताना बारामती म्हणजे 'शिस्त' असे समीकरण होते. अधिकाऱ्यांवर दादांचा वचक होता, त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना डोके वर काढायला वाव नव्हता; मात्र, गेल्या काही महिन्यांत परिस्थिती बदललेली दिसत आहे. उपनगरांमध्ये तरुणांच्या टोळ्या सक्रिय होताना दिसत आहेत.खासगी सावकारी, अपहरण, खंडणी, जुगार, अवैध दारू विक्री आणि वाळू उपसा यासारख्या अवैध धंद्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. रात्रीच्या वेळी मुख्य चौकात फिरतानाही नागरिक आता धास्तावलेले असतात. पोलिसांचा दरारा पूर्वीसारखा राहिला नसल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
बारामती म्हणजे विकासाचे 'रोल मॉडेल', मात्र दादांच्या निधनानंतर अनेक महत्त्वाचे प्रकल्प 'लाल फिती'त अडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. निधी मिळवण्यापासून ते कामे पूर्णत्वास नेण्यापर्यंत जी 'दादा स्टाईल' होती, ती आता कुठेही दिसत नाही. नियोजित औद्योगिक प्रकल्पांचे भविष्य काय, याबाबतही उद्योजकांमध्ये संभ्रम आहे.
बारामतीचा सामान्य माणूस आजही सुन्न आहे. आमचे प्रश्न दादा एका फोनवर सोडवायचे, आता कुणाच्या दारात उभं राहायचं? ही भावना सर्वसामान्य जनतेत आहे. राजकीय स्थिरता नसेल तर शहराचे आर्थिक चक्रही विस्कळीत होते, याचा अनुभव सध्या व्यापारी वर्ग घेत आहे.
बारामतीला या संकटातून बाहेर काढण्यासाठी आता एका खंबीर आणि सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. प्रशासनानेही केवळ राजकीय आदेशांची वाट न पाहता, गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी कठोर पावले उचलणे ही काळाची गरज बनली आहे. अन्यथा,अजितदादांच्या 'स्वप्नातील बारामती' गुन्हेगारीच्या विळख्यात अडकण्यास वेळ लागणार नाही.
ज्या बारामतीचा दरारा संपूर्ण महाराष्ट्रात होता, जिथे सुई पडली तर त्याचा आवाज मुंबईच्या मंत्रालयात पोहोचायचा, त्याच बारामतीत अजितदादांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांनी आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. बारामतीची ओळख विकास हीच राहिली पाहिजे विनाशी नाही, हे आता त्यांनी दाखविणे गरजेचे आहे.
अजितदादांच्या शिस्तीचा आणि प्रशासकीय पकडीचा दरारा होता. त्यांच्या एका शब्दावर प्रशासन हालायचे आणि गुंड प्रवृत्तीचे लोक शहराच्या वेशीबाहेर राहायचे; मात्र त्यांच्या पश्चात निर्माण झालेल्या राजकीय पोकळीमुळे कालपर्यंत बिळात लपलेले गल्लीतले गुंड आता हळूहळू डोके वर काढू लागले आहेत.