रायरीतील जमीन खरेदी-विक्रीस बंदी; ‘हे’ आहे कारण

रायरीतील जमीन खरेदी-विक्रीस बंदी; ‘हे’ आहे कारण

भोर : पुढारी वृत्तसेवा : रायरी (ता. भोर) येथील शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनीचे गट माहीत नसल्यामुळे कोणाचीही जमीन कोणीही कसत आहे. जोपर्यंत शेतकर्‍यांच्या सातबाराची नोंद रीतसर सापडत नाही तोपर्यंत गावच्या हद्दीतील जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यास बंदी करण्याचा ठराव ग्रामपंचायतीच्या वतीने भोर महसूल विभागास देण्यात आला. रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याशी व निरा-देवघर धरणाच्या कडेला रायरी हे निसर्गरम्य गाव भोरपासून 25 किलोमीटर अंतरावर आहे.

धरण होण्यापूर्वी या भागात कोणीही जमीन खरेदी-विक्रीचा व्यवहार करीत नव्हते. परंतु, धरण झाल्यानंतर मुंबई, पुणे व अन्य शहरांतील अनेकांनी जमिनी विकत घेतल्या. अनेकांनी एजंटमार्फत कवडीमोल भावाने जमिनींची खरेदी केली. परिणामी, अनेक शेतकर्‍यांकडे आता जमिनी शिल्लक नाहीत. कवडीमोल भावाने घेतलेल्या जमिनी विकसित करून पुन्हा चढ्या भावाने विकली जात आहेत. त्यामुळे यापुढे राहिलेल्या जमिनीची खरेदी-विक्री होऊ नये, यासाठी रायरी ग्रामस्थांनी यापुढे जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यास बंदी करण्याचा निर्णय घेतला. याबाबतचे फलक गावात जागोजागी लावण्यात आले आहेत.

70 टक्के जमीन विक्री

निरा-देवघर धरण परिसरातील हिरडोशी, पर्‍हर, निगुडघर, साळव, वेणुपुरी, कोंढरी, आशिंपी, शिरगाव अन्य गावे या धरणात गेली आहेत. धरणामुळे विस्थापित झालेले अनेक शेतकरी उर्वरित डोंगरमाथ्याची जमीन दलालांच्या मध्यस्थीने विकत आहेत. परिसरातील 70 टक्के जमिनीची विक्री झाली आहे. उर्वरित जमीन तरी कोणी विकू नये, असा निर्धार ग्रामस्थांनी केला असून, त्यांच्या या धाडसी निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सध्या निरा-देवघर धरण भागात मोठ्या प्रमाणत जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार होत आहेत. यामध्ये शेतकर्‍यांची मोठी फसवणूक होत आहे. त्याला आळा बसावा, यासाठी रायरी गावातील तरुणवर्गाने एकत्र येत हा निर्णय घेतला आहे.

– सुनीता किंद्रे, सरपंच, रायरी (ता. भोर)

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news