

Balasaheb Thorat on voter list errors
पुणे: मतदार यादीबाबत नागरिकांमध्ये संभ्रम असून, नेमके काय घडले हे स्पष्ट सांगितले पाहिजे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जी मांडणी केली, तिचा गांभीर्याने विचार करायला हवा. मतदार यादीतील घोळ हा विषय फक्त एका पक्षाचा नसून लोकशाही व राज्यघटनेशी संबंधित आहे, असे मत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी रविवारी व्यक्त केले. एका कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
थोरात म्हणाले, राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगाने दिली पाहिजेत. अन्यथा, नागरिकांनी हा विषय हाती घेतला पाहिजे. या विषयाबाबत नागरिक उदासिन राहिले, तर पुढचा काळ देशासाठी कठीण ठरेल. (Latest Pune News)
मतदार याद्या एका क्लिकवर मिळायला हव्यात. असे असताना आयोगाकडून ढिगभर कागदपत्रे पाठविली जातात, म्हणजे काहीतरी लपविण्याचा प्रयत्न होत आहे, असेच दिसते. माहिती डिजिटल स्वरूपात का देत नाही? सीसीटीव्ही फुटेज 45 दिवसांत नष्ट का केले जाते? असा प्रश्न थोरात यांनी उपस्थित केला.
सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला सर्व कागदपत्रे द्यावीत, असे सांगितले होते. तरीही आयोगाने ती न देण्याचा निर्णय घेतला आणि तो राबवला जात आहे. अनेकांकडून राहुल गांधींनी प्रश्न उशिरा उपस्थित केल्याची टीका होत आहे; पण आयोगाने कागदपत्रे डिजिटल स्वरूपात दिली असती, तर एका दिवसात ती समोर आली असती, असे थोरात यांनी सांगितले.
याबाबत न्यायालयात जाणार का, असे विचारले असता ते म्हणाले, राज्यात पक्षाचे विभाजन झाले, तरी त्यावरचा निर्णय तीन वर्षांत दिला नाही. तो आठ दिवसांत देता आला असता. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवली जाईल का? या प्रश्नावर त्यांनी सांगितले, काँग्रेस पक्ष योग्य वेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निर्णय घेईल. निवडणुका आल्या की महाविकास आघाडी म्हणून एकत्र बसून चर्चा होईल.