

यवत : दौंड तालुक्यातील वाखारी गावच्या हद्दीत असलेल्या न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार करणारा आरोपी बाळासाहेब मांडेकर यासह तीन आरोपींना यवत पोलिसांनी बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पुणे येथून ताब्यात घेत अटक केली असल्याची माहिती यवत पोलिसांनी दिली. (Pune Latest News)
गोळीबाराची घटना दि. २१ जुलै रोजी रात्री साडेअकरा दरम्यान घडली होती. बाळासाहेब मांडेकर हा आमदाराचा भाऊ असल्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला गेला मात्र ही घटना प्रसार माध्यमांच्या माध्यमातून प्रसारित झाल्यानंतर यवत पोलीस खडबडून जागे झाले होते. या घटने प्रकरणी न्यू अंबिका कला केंद्राचे व्यवस्थापक बाबासाहेब अंधारे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती त्यानुसार यवत पोलिसांनी चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर यवत पोलीस आरोपींचा शोध घेत होते दरम्यान यवत पोलिसांनी गोळीबार करणारा मुख्य आरोपी बाळासाहेब मांडेकर यासह तीन आरोपींना अटक केली आहे.