पुणे: रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि रेल्वेतून कोणतीही अनुचित साहित्याची वाहतूक होऊ नये, याकरिता रेल्वे प्रशासनाने आता पुणे रेल्वे स्थानकावर दोन बॅगेज स्कॅनर मशिन बसविल्या आहेत. यामुळे आता स्थानकाच्या सुरक्षेत वाढ होत असल्याचे समोर आले आहे.
पुणे रेल्वे स्थानक म्हणजे ‘आओ जाओ घर तुम्हारा’ याप्रमाणे झाले होते. याबाबत दै. ‘पुढारी’कडून प्रवासी आणि रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेबाबत सातत्याने वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची दखल घेत आता रेल्वे प्रशासनाने स्थानकावर दोन बॅगेज स्कॅनर मशिन बसवल्या आहेत.
पूर्वी स्थानकात येणारे प्रवासी आपल्या बॅगा घेऊन सरळ आत प्रवेश करत होते, त्यांच्या बॅगांमध्ये काय आहे, रेल्वेतून बॅगांच्या माध्यमातून कोण काय घेऊन चाललंय, याची माहिती कोणालाही मिळत नव्हती. अखेर हे दोन बॅगेज स्कॅनर मशिन बसवल्यामुळे प्रवासी आपल्या बॅगांमध्ये काय घेऊन जाताहेत, हे समजल्यामुळे रेल्वे गाडीसह स्थानकावरील प्रवाशांची आता सुरक्षा भक्कम होणार आहे.
आरपीएफकडून तपासणी...
रेल्वे स्थानकावर बसवण्यात आलेल्या या दोन बॅग स्कॅनर मशिनमुळे येथील स्कॅनर मशिनची संख्या तीन झाली आहे. एक मशिन मुख्य प्रवेशद्वारावर (जुनी), दुसरी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील सरकत्या जिना चढल्यावर (नवीन) आणि तिसरी मशिन प्लॅटफॉर्म क्रमांक 6 जवळील जिना चढल्यावर ठेवण्यात आली आहे. या मशिनवर आरपीएफ जवानांमार्फत प्रवाशांच्या बॅगांची तपासणी केली जात आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पुणे रेल्वे स्थानकावर दोन नव्या बॅगेज तपासणी मशिन बसवण्यात आल्या आहेत. या मशिनच्या माध्यमातून प्रवाशांच्या सामानाची तपासणी करूनच प्रवाशांना स्थानकात प्रवेश दिला जात आहेत. एकूण तीन मशिनच्या माध्यमातून प्रवाशांच्या बॅगांची तपासणी केली जात आहे. यामुळे प्रवाशांची सुरक्षा आता आणखी भक्कम झाली आहे.
- डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, पुणे विभाग