

पुणे: आयुष गणेश कोमकर याच्या खूनप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, शिवम आंदेकर यांच्यासह अकरा जणांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये दोन महिलांचा देखील समावेश आहे. याप्रकरणी आयुष याची आई कल्याणी कोमकर (रा. भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. (Latest Pune News)
दरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाने दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून तपास करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. अमित पाटोळे आणि यश पाटील अशी त्यांची नावे आहेत.
शुक्रवारी (दि.५) सायंकाळी साडे सात वाजताच्या सुमारास नाना पेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये आयुष याचा पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला आहे. गणेश कोमकर हा माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातील आरोपी आहे. आंदेकर टोळीकडून वनराज यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आयुष याचा खून करण्यात आल्याचे बोलले जाते आहे. पाच दिवसापूर्वी आंदेकर टोळीकडून आंबेगाव पठार परिसरात सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते यांच्या घराची रेकी करण्यात आली होती.
हे दोघे देखील वनराज यांच्या खुनातील आरोपी आहेत. भारती विद्यापीठ पोलिसांनी टोळीतील दत्ता काळे याला पकडले होते. त्यावेळी आंदेकर टोळी वनराज यांच्या खुनाचा बदला घेण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले होते. शुक्रवारी आंदेकर टोळीकडून गणेश याचा मुलगा आयुष कोमकर याचा खून करण्यात आला. त्यामुळे पुन्हा एकदा पुण्यात टोळी युद्धातून खुनाचे सत्र सुरू झाल्याचे दिसते.