

पुणे: बाजारात मिळणारे तयार मांसाहारी पदार्थ खाण्याचा कल वाढला असला तरी अनेकदा हे पदार्थ पूर्णपणाने शिजवलेले नसतात तसेच स्वच्छतेचेही पालन केले जात नाही, त्यामुळे गुलेन बॅरी सिंड्रोम म्हणजेच जीबीएसचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच या साथीचा संसर्ग होऊ नये, यासाठी असा मांसाहार टाळण्याचे आवाहन शाकाहार चळवळीचे पुरस्कर्ते, सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. कल्याण गंगवाल यांनी पुणेकरांना केले आहे.
प्रामुख्याने पुण्याच्या उपनगरांमध्ये जीबीएस नावाच्या आजाराने थैमान घातले असून या आजारामुळे पुण्यामध्ये आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी ही एक प्रजाती जीबीएसचा जीवाणू आहे आणि जगभरात झुनोटिक रोगाचे प्रमुख कारण आहे.
या आजाराचा प्रसार दूषित पाण्यावाटे तसेच कच्चे, अर्धवट शिजवलेल्या मांसातून जीवाणूचा प्रसार होतो. यासाठी पाणी उकळून, तसेच ब्लिचिंग पावडरची योग्य मात्रेत प्रक्रिया करूनच पिण्यासाठी वापरावे. शक्यतो पालेभाज्या, फळे, कडधान्ये आदींचा आहारात समावेश करावा.
हा आजार संसर्गजन्य नसल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असे डॉ. कल्याण गंगवाल यांनी स्पष्ट केले आहे. डॉ. गंगवाल म्हणाले की, पशुसंवर्धन विभागाला कुक्कुटपालन केंद्रांतील घेतलेल्या कोंबड्यांच्या नमुन्यामध्ये जीबीएसला कारणीभूत ठरणारा कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी जीवाणू आढळला आहे. तसेच, उलटी व जुलाबास कारणीभूत असलेला नोरोव्हायरस विषाणूही आढळला आहे, कोंबड्यामध्ये सामान्यतः कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी’आढळतो.
जीबीएस आजाराला आळा घालण्यासाठी मांसाहार टाळावा. तसेच जीबीएसच्या निवारणासाठी, पाणी उकळून प्यावे, शुद्ध शाकाहारी आहार नियमितपणे घ्यावा. यामुळे जीबीएसच्या निवारणासाठी मोठ्या प्रमाणावर मदत होईल.बाजारातील तयार अन्नपदार्थ करताना बर्याच वेळा स्वच्छता ठेवली जात नाही, तसेच ते करणार्यांकडून त्याबाबत काळजी घेतली जात नाही, असे दिसून येते. म्हणून शक्यतो घरचेच शिजवलेले अन्न खावे, असे आवाहन डॉ. कल्याण गंगवाल यांनी समस्त पुणेकरांना केले आहे.