घटस्फोटात चांदीच्या वाटीने खोळंबा! अखेर पतीकडून पत्नीचा हट्ट मान्य

घटस्फोटात चांदीच्या वाटीने खोळंबा! अखेर पतीकडून पत्नीचा हट्ट मान्य

पुणे : सात जन्म सोबत राहण्याच्या आणाभाका घेत लग्न केलेल्या त्यांनी एका वर्षातच वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या वेळी, पत्नीने सर्व साहित्यांसह दहा लाख रुपये पोटगीची मागणी केली. पतीने साहित्यासह दहा लाख रुपये व काही साहित्य गहाळ झाल्याने आणखी वीस हजार रुपये पत्नीला दिले. मात्र, साहित्यांमध्ये आजीने दिलेली चांदीची वाटी नसल्याने पत्नीने वाटीचा हट्ट धरला. वाटीसाठी पत्नीचा हट्ट पाहता वाटी मिळाली तर पत्नीस परत करणार, अशी ग्वाही त्याने दिली. पत्नीलाही ते मान्य झाल्यानंतर वाटीसाठी रखडलेला काडीमोड तत्काळ मंजूर झाला.

अनुपमा व अनुज (नावे बदलली आहेत) दोघेही उच्चशिक्षित. तो 38 वर्षांचा तर ती 34 वर्षांची. अनुज अभियंता तर अनुपमा गृहिणी. दोघांचा 7 जुलै 2018 रोजी कोथरूड परिसरातील आशिष गार्डन येथे विवाह झाला. यादरम्यान, वैचारिक मतभेद निर्माण झाल्यानंतर दोघेही लग्नाच्या एका वर्षानंतर विभक्त राहू लागले. त्यानंतर, दोघांनी तडजोड करत न्यायालयात परस्परसंमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला. या वेळी, अनुपमा हिने स्त्रीधन व कायमस्वरुपी पोटगी स्वरुपात दहा लाख रुपयांची मागणी केली. तसेच, अनुज विरोधात दाखल करण्यात आलेली कौटुंबिक हिंसाचाराची केसही मागे घेण्याचे ठरले.  त्यानंतर, पतीने लग्नात आलेले स्त्रीधन, संसार उपयोगी वस्तू, दहा लाख रुपये दिले. यामध्ये, काही वस्तू नसल्याने त्याने त्याबदल्यात अतिरिक्त वीस हजार रुपये पत्नीस दिले. आज्जीने दिलेली चांदीची वाटी आढळून आली नाही. तिने चांदीच्या वाटीसाठी हट्ट धरला. याप्रकरणात, न्यायालयाने पत्नीसह पतीचीही समजून काढल्यानंतर संमतीने घटस्फोट झाला.

  •  परस्पर संमतीच्या प्रकरणात पत्नी चांदीच्या वाटीवर राहिली ठाम
  • वाटी सापडली तर परत करण्याच्या पतीच्या संमतीनंतर घटस्फोट मंजूर

पत्नीला चांदीची वाटी तिच्या आजीने दिली होती. वाटीखेरीज अन्य वस्तूही गहाळ होत्या. त्याकडे, पत्नीने दुर्लक्ष केले. परंतु, आजीने दिलेल्या असल्याने वाटीमागे भावना होत्या. बर्‍याच प्रकरणात काही वर्षांनंतर वस्तू आहे तशा मिळत नाहीत. यासारख्या प्रकरणांमध्ये बर्‍याच वेळा पत्नीलाच समजून घ्यावे लागते. परस्पर संमती असूनही प्रकरणास चार वर्षे लागली. अखेर, पतीनेही गहाळ वस्तू झाल्याचे मान्य करत पत्नीची घालमेल पाहून ती शोधून सापडल्यास परत करण्याचा समजूतदारपणा दाखविल्याने घटस्फोटाचे प्रकरण निकाली निघाले.

– अ‍ॅड. राणी कांबळे-सोनावणे

भावना महत्त्वाच्या असल्या तरी तडजोड हवीच

साहित्य गहाळ झाल्याच्या बदल्यात पतीने अतिरिक्त 20 हजार रुपये दिले आहेत. आजीने दिलेली वाटी असल्याने या भावनाही महत्त्वाच्या आहेत. काहीवेळा तडजोड ही करावीच लागते. वाटीची मागणी कायम राहिल्यास हा दावा सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ शकतो. काही वर्षांनंतर वस्तू आहेत तशा मिळत नाहीत. बर्‍याच प्रकरणात या गोष्टी झाल्या असल्याचे न्यायालयाने पती व पत्नीला समजावून सांगितले. त्यानंतर, पतीने वाटी सापडली, तर परत करणार असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यानंतर पत्नीनेही त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news