पुणे: औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील वातावरण तापले असताना आता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने सरकारलाच इशारा दिला आहे. क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर अत्याचार, गुलामगिरी आणि लाचारीची आठवण करून देते.
राज्य सरकारने ही कबर लवकरात लवकर काढावी. सरकारने हे केले नाही, तर आम्हाला स्वाभिमानी हिंदू समाजाला घेऊन बाबरी मशिदीसारखी पुनरावृत्ती करावी लागेल. औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करून टाकू, असा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने शनिवारी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिला.
सोमवारी शिवजयंतीदिनी (फाल्गुन कृष्ण तृतीया) राज्यभर सर्व तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालयांबाहेर कबर हटाव आंदोलन करण्यात येणार आहे, असेही त्यांनी या वेळी जाहीर केले.पत्रकार परिषदेला विश्व हिंदू परिषद प्रांत मंत्री किशोर चव्हाण, बजरंग दलाचे प्रांत संयोजक नितीन महाजन आणि प्रांत सहसंयोजक संदेश भेगडे उपस्थित होते. किशोर चव्हाण म्हणाले, औरंगजेबाने आपले संपूर्ण आयुष्य दगाबाजी, विश्वासघात व हिंदू द्वेष करण्यात घालवले. त्याने आपल्या सख्ख्या भावांचे खून केले.
बापाला कैदेत टाकले. काशी विश्वनाथ, मथुरा, सोमनाथ येथील मंदिरे त्याने फोडली. छत्रपती संभाजी महाराज यांचा 40 दिवस छळ करणार्या औरंगजेबाची कबर म्हणजे त्याने केलेल्या क्रूर आणि अन्यायाला प्रोत्साहन देण्यासारखे आहे. त्यामुळे कबर हटवली पाहिजे.
नितीन महाजन म्हणाले, औरंगजेबाच्या कबरीमुळे आजही त्याच्या विचारसरणीचे अनुयायी तयार होत आहेत. ते इतिहासावर बोट ठेवून मुघल शासकाच्या पावलावर पाऊल ठेवत या आपल्या देशात शरिया कायद्यानुसार वागत आहेत. 2047 पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पाहात आहेत. या प्रवृत्तीला औरंगजेबाच्या कबरीतून प्रेरणा मिळते. त्यामुळे कबर जतन करण्याची गरज नाही.
सरकारने ही कबर काढून टाकावी. अन्यथा विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि इतर हिंदू संघटनांच्या माध्यमातून कार्यकर्ते बाबरी मशिदीप्रमाणे औरंगजेबाची कबरही उद्ध्वस्त करतील. त्याआधी राज्यभर जनजागृती केली जाईल. सोमवारी राज्यभर आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात येईल. राज्य सरकारने कारवाई केली नाही तर आम्ही कबर उद्ध्वस्त करून टाकू, असा इशाराही त्यांनी दिला.
औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली
धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यापाठोपाठ विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाने औरंजेबाची खुलताबाद येथील कबर नष्ट करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे औरंगजेबाच्या कबर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. एसआरपीएफची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे.
या बंदोबस्तात दोन पोलिस अधिकारी आणि 15 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कबर परिसरातील दोन ठिकाणी नाकाबंदी आणि फिक्स पॉइंट लावण्यात आले आहेत. कबरीकडे जाणार्या प्रत्येकाची तपासणी केली जात आहे. तसेच खुलताबाद शहरातही पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.