आळेफाटा : पुढारी वृत्तसेवा : पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक व विविध कार्यकारी सोसायटीत चोरट्यांनी रविवारी (दि. 14) मध्यरात्री केलेला चोरीचा प्रयत्न फसला. सुदैवाने प्रवेशद्वाराच्या ग्रिलचे कुलूप न तुटल्याने ही चोरी टळली. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. बँकेचे शाखाधिकारी इंद्रजित चिंडालिया यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पिंपळवंडी येथे विविध कार्यकारी सोसायटीची इमारत आहे. या इमारतीत तळमजल्यावर सोसायटीचे कार्यालय व पहिल्या मजल्यावर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा आहे. रविवारी मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास दोन चोरट्यांनी सोसायटी कार्यालयाच्या पाठीमागील खिडकीचे गज कापून आतमध्ये प्रवेश केला.
टेबल व लोखंडी कपाटातील कागदपत्रे अस्ताव्यस्त केली. त्यानंतर पुढील दरवाजाचे कुलूप तोडले आणि वरील मजल्यावर जाण्यासाठी असलेल्या जिन्याच्या ग्रिलच्या दरवाजाचे कुलूप तोडले. वरच्या मजल्यावरील बँकेच्या प्रवेशद्वाराच्या ग्रिलच्या दरवाजाचे कुलूप तोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला, मात्र त्यांना कुलूप तुटले नाही. सोमवारी (दि. 15) सकाळी सोसायटीचे कर्मचारी गौरव भागवत हे कार्यालय उघडण्यासाठी आले असता त्यांना चोरीचा प्रकार निदर्शनास आला.
हेही वाचा