पुणे: कुटुंबासह झणझणीत अन् तर्रीदार मिसळचा आस्वाद घेणारी तरुणाई... मिसळवर ताव मारण्यासाठी झालेली मोठी गर्दी अन् गुलकंद चित्रपटातील टीमशी संवाद साधण्याची पुणेकरांना मिळालेली संधी... अशा उदंड प्रतिसादात दैनिक ‘पुढारी’च्या वतीने आयोजित आणि ऑक्सिरिच प्रायोजित दै. ‘पुढारी’ महामिसळ महोत्सवाच्या सीझन चारचा समारोप झाला.
पुणे असो वा कोकणातील अस्सल चवीच्या मिसळचा आस्वाद घेताना एक वेगळेच समाधान खवय्यांच्या चेहर्यावर पाहायला मिळाले. पुण्यातील विविध भागातून खवय्ये मिसळवर ताव मारण्यासाठी आले अन् खवय्यांची ही गर्दी रात्री अकरा वाजेपर्यंत कायम होती. गुलकंद चित्रपटातील टीमशी झालेला मनमोकळा अन् दिलखुलास संवाद हे निमित्त खवय्यांसाठी खास ठरले.
दै. ‘पुढारी’ महामिसळ महोत्सवाच्या दुसर्या दिवशीही खवय्यांनी मोठी गर्दी केली. गीतांची सुरेल मैफल अन् त्याचबरोबर स्वादिष्ट मिसळ चाखण्याची संधी खवय्यांना मिळाली. नितीन गायकवाड, श्रद्धा कांबळे, अजय निकम, मोना भोरे आणि संदीप जावरे या कलाकारांनी विविध गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
आपल्या कुटुंबासोबत, मित्र - मैत्रिणींबरोबर खवय्यांनी मिसळवर ताव मारला. कोणी कोकणच्या तर कोणी कोल्हापूरच्या चवीच्या मिसळचा आस्वाद घेतला. एकाच छताखाली विविध चवीच्या आणि विविध प्रकारच्या मिसळ खायला मिळाल्याने खवय्ये आनंदित दिसले. अनेकांनी मिसळचा आस्वाद घेत कुटुंबासोबत सेल्फी आणि छायाचित्रही क्लिक केले. सिंहगड रस्त्यावरील वीर बाजी पासलकर पुलाजवळील नाहटा लॉन्समध्ये हा महोत्सव झाला.
महोत्सवात सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रदिनी म्हणजेच 1 मे रोजी प्रदर्शित होणार्या गुलकंद या चित्रपटातील टीमने पुणेकरांशी संवाद साधला. अभिनेते समीर चौघुले, अभिनेत्री ईशा डे आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी पुणेकरांशी मनमोकळा संवाद साधत चित्रपटाबद्दल माहिती दिली.
गुलकंद चित्रपटातील काही डायलॉगही कलाकारांनी सादर करत दाद मिळवली. तसेच, महोत्सवातील प्रत्येक स्टॉलला भेट देत स्टॉलधारकांशी संवाद साधला आणि मिसळचा आस्वादही घेतला. कलाकारांसोबत पुणेकरांनी सेल्फी क्लिक करण्याचेही निमित्त साधले.
रविवारी महोत्सवात चविष्ट शेव आणि फरसाणने खवय्यांच्या तोंडाला पाणी आणले. याखेरीज, चीज मिसळ, मिसळ पाणीपुरी, वर्हाडी मिसळ तसेच पाव, ब्रेड याशिवाय भाकरीबरोबर मिळणार्या मिसळलाही पुणेकरांची पसंती मिळाली. बचतगटांची उत्पादने कुरडई, पापड्या, खाकरे आणि चटण्या आदींच्या खरेदीसाठीही गर्दी झाली. एकूणच मिसळ महोत्सवाला रविवारी खवय्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. उत्स्फूर्त प्रतिसादात महोत्सवाचा समारोप झाला.
खवय्यांच्या प्रतिसादाने आनंद
दै. ‘पुढारी’ आयोजित महामिसळ महोत्सवात सहभागी होऊन आनंद झाला. पुणेकर खवय्यांनी आमच्या मिसळचा आस्वाद घेतल्याचा आनंद असून, खवय्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रत्येकाने आवर्जून मिसळची माहिती घेऊन त्याचा आस्वाद घेतला आणि अभिप्रायही कळवला.
रविवारी तर खूप चांगला प्रतिसाद मिळाला. अस्सल खवय्यांनी मिसळचा आस्वाद घेतल्याचे समाधान आहे, अशी बोलकी प्रतिक्रिया महोत्सवात सहभागी झालेल्या मिसळ स्टॉलधारकांनी व्यक्त केली.
पुढारी महामिसळ महोत्सवाबद्दल ऐकले होते. येथे येऊन आनंद वाटला. प्रत्येक मिसळची चव घेतली, ती खूप वेगळी वाटली. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रांतातून आणि संस्कृतीतून आलेले स्टॉलधारक येथे पाहिले. वेगवेगळी खाद्यसंस्कृती येथे पाहिली. प्रत्येक प्रांतानुसार असलेली मिसळ येथे पाहता आली, त्याचा आनंद वाटला. आम्ही आमच्या गुलकंद चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात या महोत्सवातून केली याचा आनंद आहे.
- समीर चौघुले, अभिनेते
मी खूप मिसळ महोत्सव पाहिले आहेत. पण, ‘पुढारी’ महामिसळ महोत्सव खूप वेगळा आहे. या महोत्सवात एक उत्साह पाहायला मिळाला. वेगवेगळे स्टॉल्स हे महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात. येथे मिसळचे खूप चांगले पर्याय पाहायला मिळाले. मिसळचे अनेक प्रयोग येथे होते आणि खवय्ये हे पुणेकर असल्याने त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मोठी गर्दी पाहायला मिळाली. हा एक यशस्वी महोत्सव आहे. दै. ‘पुढारी’ने पुणेकरांना ही संधी उपलब्ध करून दिली, त्याचा आनंद आहे. प्रत्येक मराठी चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. गुलकंद चित्रपटालाही पुणेकर उत्तम प्रतिसाद देतील, हा विश्वास आहे.
- सचिन गोस्वामी, दिग्दर्शक
दै. ‘पुढारी’ महामिसळ महोत्सव पाहून खूप आनंद झाला आणि खूप मजा आली. एवढ्या वेगवेगळ्या चवीच्या मिसळ एकाच छताखाली पाहायला मिळाल्याने खूप छान वाटले. मिसळ हा पदार्थ सगळ्यांनाच आवडतो. त्यामुळे ही संधी खवय्यांसाठी खूप खास होती, असे मला वाटते. गुलकंद चित्रपटाचे पहिले प्रमोशन आम्ही या महोत्सवात केले. हा महोत्सव आमच्यासाठी स्पेशल आहे.
- ईशा डे, अभिनेत्री