बारामती: कारखान्याचे ऊस गाळप बंद झाल्यावर वायुप्रदूषण तपासणीसाठी पारवडी (ता. बारामती) येथे दाखल झालेल्या दोन फिरत्या प्रयोगशाळा वायुप्रदूषणाच्या नोंदी घेऊन पुण्याकडे परत फिरल्या. या प्रयोगशाळा परत फिरताच बारामती अॅग्रो साखर कारखान्याची धुराडी शनिवार (दि. 1) पासून मोठ्या प्रमाणात धूर ओकू लागल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
27 फेब्रुवारी रोजी तपासासाठी अधिकारी पारवडी गावात दाखल झाले. त्याच्यासोबत दोन फिरत्या वायुप्रदूषण तपासणी प्रयोगशाळा होत्या. त्यापैकी मोठ्या प्रयोगशाळेची व्हॅन पारवडी गावात चाचणीकरिता थांबवली गेली, तर दुसरी कारखान्याच्या आवारात प्रदूषणाची चाचणी करत होती. चोवीस तास वायुप्रदूषणाचे परिक्षण केल्याच्या ऑनलाइन नोंदी घेण्यात आल्या.
परीक्षणादरम्यान शेटफळगढे येथील बारामती अॅग्रो साखर कारखान्याची धुराडी काहीशी शांत होती. 28 रोजी तपासणी पथकातील दोन्ही फिरत्या तपासणी प्रयोगशाळा परतल्याबरोबर कारखान्याच्या धुराड्यांतून धुराचे लोट बाहेर पडू लागले. त्यामुळे प्रदूषण बोर्डाच्या वायुप्रदूषण चाचणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा कारखाना आमदार रोहित पवार यांचा आहे. प्रदूषण नियंत्रण महामंडळाने ऊस गळीत हंगाम संपल्यावर उशिरा तपासणी पथक धाडल्याचा ग्रामस्थ आरोप करत आहेत.
कारखान्याचे गाळप बंद होणे व त्यानंतर वायुप्रदूषणाची तपासणी करण्यासाठी फिरत्या प्रयोगशाळा गावात येणे, हे काही योगायोगाने झाले नाही. अधिकार्यांनी जाणीवपूर्वक कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी उशिरा प्रयोगशाळा पाठविल्या. प्रदूषण चाचणीबाबत संशयास जागा आहे.
- अॅड. प्रदीप गुरव, ग्रामस्थ, पारवडी