

पुण्यातील मेट्रोच्या पहिल्या दोन मार्गांचा लाभ तसा सगळ्या पुणेकरांनाच होणार असला तरी शिवाजीनगर परिसरात राहणार्या नागरिकांची सर्वाधिक सोय होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानसभेच्या येत्या निवडणुकीचा विचार केला तर पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघातच मेट्रोची तब्बल दहा स्थानके आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात मेट्रोमुळे होणार्या फायद्याचा मुद्दा गाजण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पुण्यात महामेट्रोकडून दोन मार्गांच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यात कोथरूडच्या वनाज कंपनीपासून नगर रस्त्यावरील रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी या मार्गांचा समावेश आहे. या दोन मार्गांवर एकूण 28 स्थानके असून त्यातील तब्बल दहा स्थानके एकट्या शिवाजीनगरमधील आहेत. तसेच पीएमआरडीएकडून हिंजवडी ते शिवाजीनगर कोर्ट या मार्गावर स्वतंत्र मेट्रोमार्ग उभारला जात असून त्याचे काम टाटा समूहाकडे देण्यात आले आहे.
ते काम प्रगतीपथावर असून पुढील वर्षी ते पूर्ण होईल आणि तो मार्गही पुणेकरांच्या सेवेत हजर होईल. या मार्गावरील सहा स्थानके शिवाजीनगर मतदारसंघात असणार आहेत. याचाच अर्थ मेट्रोच्या तीन मार्गांवरील तब्बल सोळा स्थानके शिवाजीनगरमधील आहेत. पुण्याच्या मेट्रोचा फायदा सर्व भागात राहणार्या पुणेकरांना होऊ लागला आहे. असे असले तरी शिवाजीनगर परिसरात म्हणजेच मेट्रोमार्गाजवळ राहणार्या पुणेकरांना मेट्रो अधिक सोयीची वाटू लागली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाची भावना आहे. पुण्यातील विकासकामांचा मुद्दा सत्ताधारी आणि विरोधकांकडून मांडला जाणार आहे. झालेल्या कामांचा मुद्दा भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून प्रचारात उपस्थित केला जाईल. त्यात मेट्रोच्या लाभाचा मुद्दा प्रामुख्याने असणार आहे. विशेषत: शिवाजीनगर परिसरातील नागरिकांना होत असलेल्या विशेष लाभाचा उल्लेखही त्यात होणार असल्याचे राजकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.