मराठी आहे तोपर्यंत गदिमा, बाबूजी आपल्यात असतील : माजी राज्यपाल राम नाईक

मराठी आहे तोपर्यंत गदिमा, बाबूजी आपल्यात असतील : माजी राज्यपाल राम नाईक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जगात जोपर्यंत मराठी बोलणारे, ऐकणारे लोक आहेत, तोपर्यंत 'गदिमा-बाबूजी' हे अद्वैत आपल्या अद्वितीय कलाकृतींनी आपल्यात असणारच आहेत, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी गुरुवारी केले. गदिमा प्रतिष्ठनतर्फे ग. दि. माडगूळकर यांच्या 46 व्या स्मृतिदिनानिमित्त 'गदिमा' पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. यंदाचा गदिमा पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आणि कवयित्री सानिया यांना प्रदान करण्यात आला.

तर 'गृहिणी-सखी-सचिव' पुरस्कार अपर्णा अभ्यंकर यांना, 'चैत्रबन' पुरस्कार कवी वैभव जोशी यांना आणि 'विद्या प्रज्ञा' पुरस्कार गायिका स्वरदा गोडबोले यांना प्रदान करण्यात आला. या वेळी राम नाईक, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर, खासदार श्रीनिवास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

राम नाईक म्हणाले, गदिमांची चित्रपट गीते आजही मराठी रसिकांना मुखोद्गत आहेत. गदिमांसारख्या व्यक्ती शतकात एखाद्यावेळीच जन्माला येतात. म्हणूनच पंचवटी म्हटल्यावर प्रभू श्रीरामांनंतर आपल्याला गदिमा आठवतात. गदिमांची पंचवटी ही साहित्य, चित्रपट आणि इतिहासातील अनेक श्रेष्ठ कलाकृतींचे जन्मस्थान तर आहेच, पण अनेक श्रेष्ठ कलाकारांच्या वावरामुळे पुनीत झालेली वास्तू आहे.
ज्येष्ठ लेखिका आणि कवयित्री सानिया म्हणाल्या, स्त्रिया शिकतात, घराबाहेर पडतात, कोणत्याही क्षेत्रात काम करतात, अर्थार्जन करतात, यश मिळवतात.

पण, या सगळ्या प्रवासाचा, बदलत्या राजकीय आणि सामाजिक बदलांचा आढावा घेतला, तरी माझ्यासारख्या लेखिकेला अस्वस्थ वाटते. कारण आता स्त्री आपल्या सत्तेच्या चौकटीपलीकडे जात आहे का, अशी धास्ती अनेकांना वाटायला लागली आहे. त्यातूनच स्त्रीवर सार्‍या कुटुंब संस्थेची, समाजाची आणि पारंपरिक संस्कृतीची संपूर्ण जबाबदारी आहे, असे सांगून तिला स्वातंत्र्याचे अवकाश देताना तिचे पाय मात्र या परंपरेच्या जोखडात बांधून ठेवले जात आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news