जेजुरी: जेजुरी (ता. पुरंदर) औद्योगिक वसाहतीमधील (एमआयडीसी) कारखानदार, उद्योजकांवर प्रशासनाचा अंकुश राहिलेला नाही. मनमानी व बेकायदेशीरपणे काम होत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जेजुरी इंडस्ट्रीज सर्व्हिसेस असोसिएशन (जीसा) व संभाजी ब्रिगेड संघटनेने दिला आहे.
या संदर्भात औद्योगिक विकास महामंडळ जेजुरी शाखेसह सर्व कारखान्यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष व ’जीसा’चे अध्यक्ष संदीप जगताप, संपत कोळेकर, महेश उबाळे, नजीर शेख, अजय जगताप, विक्रम फाळके, विकास झगडे, बाळासाहेब जरांडे, महेश ढमाळ, विकास पवार आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
जेजुरी औद्योगिक वसाहतीत कामगारांच्या जिवाशी खेळ होत आहे. येथील काही कंपन्यांमध्ये धोकादायक पद्धतीने उत्पादन घेतले जाते. कंपन्यांबाहेर अवजड वाहनांची बेशिस्त पार्किंग असते, त्यामुळे अपघात होत आहेत. गरजवंताला प्लॉट न देता काही कारखानदारांना जादा प्लॉट वितरित करण्यात आले आहेत. काही उद्योजक मनमानी पद्धतीने काम करत असून, कामगारांची पिळवणूक होत आहे.
स्थानिक भूमिपुत्रांना डावलून परप्रांतीय ठेकेदारांना येथे कामे दिली जातात. ’कारखानदार तुपाशी आणि भूमिपुत्र उपाशी’ अशी येथील अवस्था आहे. याशिवाय अप्रशिक्षित कामगारांचा भरणा, कुशल कामगारांसाठी आरोग्यासह अन्य सोयीसुविधांचा अभाव तसेच कामाच्या वेळेबाबत पिळवणूक होत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत, असे आरोप ’जीसा’ व संभाजी ब्रिगेड संघटनेने केले आहेत.
याबाबत पुढील आठवड्यात बैठकीचे आयोजन करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन व कारखानदार राहतील, असा इशाराही ’जीसा’ व संभाजी ब्रिगेड संघटनेने निवेदनातून दिला आहे.