

पुणे : राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा आज मंगळवार दिनांक 27 मे पासून आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी आवेदनपत्र सादर केलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्राची वेबलिंक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www. mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. तसेच, माहिती भरलेल्या 5 हजार 891 उमेदवारांच्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात येणार असल्याचे देखील स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणार्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचे दोन टप्प्यात आयोजन केले आहे. त्यानुसार या परीक्षा 27 ते 30 मे आणि 2 जून ते 5 जून या कालावधीत घेतल्या जाणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणार्या ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ अर्थात टीएआयटी परीक्षेसाठी दोन लाख 36 हजार 591 उमेदवारांनी अर्ज केले होते. परंतु, दुबार अर्ज, शुल्क न भरलेले वगळून दोन लाख 28 हजार 808 उमेदवारांचे अर्ज अंतिम केले आहेत. संबंधित उमेदवारांची परीक्षा 27 मे ते 5 जूनदरम्यान घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
राज्याच्या शिक्षण विभागातर्फे शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवली जात आहे. परीपूर्ण माहिती भरलेल्या उमेदवारांचा विचार करून शक्य तेवढे बदल केल्याचे परीक्षा परीषदेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेऊन विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. जून महिन्याच्या अखेरीस निकाल जाहीर होण्याची शक्यता असल्याचे देखील परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.