विद्यापीठ चौकातील ग्रेड-सेपरेटरच्या इस्टिमेटला मंजुरी

लांबी कमी केल्याने खर्च 30 कोटींनी कमी
Pune News
विद्यापीठ चौकातील ग्रेड-सेपरेटरच्या इस्टिमेटला मंजुरीPudhari
Published on
Updated on

पुणे: गणेशखिंड रस्त्यावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील (आनंद ऋषीजी चौक) प्रस्तावित असलेल्या ग्रेड-सेपरेटरच्या कामाला महापालिकेच्या इस्टिमेट कमिटीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या ग्रेड-सेपरेटरसाठी 70 कोटींचा अंदाजित खर्च येणार असून, लांबी कमी केल्याने खर्चात तब्बल 30 कोटींची बचत होणार आहे. सिमला ऑफिसकडून औंधकडे जाणार्‍या रस्त्यावर हा ग्रेड-सेपरेटर तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे सेनापती बापट रस्त्याने येणार्‍या वाहनांनाही या ग्रेड-सेपरेटरचा वापर करता येणार आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) शिवाजीनगर ते हिंजवडी या मार्गावर मेट्रो प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी अडसर ठरणारे विद्यापीठ चौकातील दोन उड्डाणपूल कोविड कालावधीत पाडण्यात आले आहेत. त्यांच्या जागी एकाच खांबावर दुमजली उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या दुमजली उड्डाणपुलाच्या पहिल्या मजल्यावर दुहेरी वाहतूक आणि त्यावरील भागावर मेट्रो मार्गिका अशा पद्धतीचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय या चौकात ग्रेड-सेपरेटरही प्रस्तावित असून, तो शिवाजीनगरकडून औंधकडे जाणाऱ्या वाहनांसाठी करण्यात येणार आहे. तसेच, सेनापती बापट रस्त्यावरून बाणेर आणि पाषाणकडे जाण्यासाठी उड्डाणपुलाला दोन लेन रॅम्पद्वारे जोडण्यात येणार आहेत.

दरम्यान, उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर ग्रेड-सेपरेटरचे काम सुरू करण्याचा निर्णय घेतलेला होता. त्यानुसार सध्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असून, येत्या 1 मेपासून हा पूल वाहतुकीसाठी सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे ग्रेड-सेपरेटरचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

त्यानुसार प्रकल्प विभागाने या ग्रेड-सेपरेटरच्या कामाचा आराखडा आणि त्यांचे पूर्वगणनपत्रक इस्टिमेट कमिटीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या इस्टिमेटच्या बैठकीत ग्रेड-सेपरेटरच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली.

आधीच्या प्रस्तावानुसार ग्रेड-सेपरेटर गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निक येथून सुरू होणार होता. मात्र, त्यात सेनापती बापट रस्त्यावरील वाहतूक जोडण्याचा प्रस्ताव नव्हता. त्यात सुधारणा करून सेनापती बापट रस्त्यावरील वाहतुकीला याचा वापर करता यावा, यासाठी ग्रेड-सेपरेटरची लांबी तीनशे मीटरने कमी करण्यात आली. त्यामुळे खर्चामध्ये 30 कोटी रुपयांची बचत होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

असा असेल ग्रेड-सेपरेटर

सिमला ऑफिस बाजूने ते औंधच्या दिशेला

लांबी : 210 मीटर

रुंदी : 8 मीटर (2 लेन)

अंदाजे खर्च : 70 कोटी रुपये

कामाचा कालावधी : 2 वर्षे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news