कोल्हेवाडी शीव रस्त्याच्या कामाला मंजुरी; परिसरातील नागरिकांत समाधान

कोल्हेवाडी शीव रस्त्याच्या कामाला मंजुरी; परिसरातील नागरिकांत समाधान
खडकवासला :  पुढारी वृत्तसेवा : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या खडकवासला व किरकटवाडी गावच्या हद्दीवरील  कोल्हेवाडी शीव रस्त्यासाठी महापालिकेने  अखेर 1 कोटी 66 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या रस्त्याच्या समस्येबाबत दै. 'पुढारी'ने सातत्याने बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या तसेच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह  नागरिकांनी आंदोलने केली होती. याची प्रशासनाने अखेर दखल घेतली आहे. या रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, स्थायी समितीने आर्थिक मंजुरीही दिली. त्यामुळे बहुचर्चित कोल्हेवाडी शीव रस्त्याचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
खराब रस्त्यामुळे हजारो रहिवाशांना वर्षानुवर्षे वाहतूक कोंडी, अपघात, खडतर प्रवास अशा गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत दै. 'पुढारी'ने सातत्याने वृत्तांकन केले होते. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून या समस्येविरोधात तीव— आंदोलनेही केली होती. प्रदेश भाजप ओबीसी आघाडीचे सचिव दत्तात्रय कोल्हे यांनी शीव रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील व स्थानिक आमदार भीमराव तापकीर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. आ. तापकीर यांनी याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
खडकवासला व किरकटवाडी शीव रस्त्याच्या प्रस्तावाला आर्थिक मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे लवकरच रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. येत्या महिन्यांत प्रस्तावित काम पूर्ण होणार आहे.
– अमर शिंदे, कार्यकारी अभियंता, पथ विभाग, महापालिका   
पहिल्या टप्प्यात तीनशे मीटर अंतराचा रस्ता होणार आहे. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात पुढील रस्ता होणार आहे. रस्त्यासाठी सर्व नागरिक रस्त्यावर उतरले व आंदोलने केल्यामुळे प्रशासनास अखेर जाग आली.
-दत्तात्रय कोल्हे, सचिव, भाजप प्रदेश ओबीसी आघाडी

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news