

पुणे: महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 या परीक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीने शिफारस केलेल्या 164 उमेदवारांपैकी दिलेल्या मुदतीत 45 उमेदवार रुजू न झालेल्या संबंधित उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे.
सहाय्यक कक्ष अधिकारी संवर्गाच्या एकूण 164 पदांसाठी दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल 11 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. सरळ सेवा सहाय्यक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षा 2023 च्या अंतिम निकालाच्या आधारे आयोगाने शिफारस केलेल्या 164 उमेदवारांची या विभागाच्या मंत्रालयीन विभागात / महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात सहाय्यक कक्ष अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्याचबरोबर उमेदवारांना नियुक्तीचा स्वीकार करण्यासाठी 10 डिसेंबर 2024 पर्यंतची मुदत देण्यात आली होती.
सरळसेवा सहाय्यक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षा 2023 मधून नियुक्त झालेल्या 18 उमेदवारांनी केंद्र/राज्य शासनाच्या सेवेत अगोदरच कार्यरत असल्यामुळे सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर रुजू होण्यासाठी मुदतवाढ मिळण्याबाबत विनंती केली होती. अशा 18 उमेदवारांना नियुक्तीचा स्वीकार करण्यासाठी 9 जानेवारी 2025 पर्यंत मुदतवाढही देण्यात आली.
नियुक्ती आदेशात नमूद केलेल्या 30 दिवसाच्या मुदतीत उमेदवार रुजू न झाल्यास किंवा दिलेल्या कालावधीत रुजू होण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती न केल्यास किंवा वाढीव कालावधीत रुजू न झाल्यास नियुक्ती प्राधिकारी यांनी सबंधित उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे. आता नियुक्ती केलेल्या 164 उमेदवारांपैकी व मुदतवाढ दिलेल्या 18 उमेदवारांपैकी एकूण 45 उमेदवारांनी त्यांना दिलेल्या कालावधीत नियुक्ती स्वीकारली नाही. त्यामुळे त्या 45 उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.