क्वीन्स गार्डन आणि पुणे स्टेशन परिसरातील वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणार्या साधू वासवानी रेल्वे उड्डाणपुलासाठी मध्य रेल्वेने ब्लॉक जाहीर केला आहे. मात्र, या भागातील झोपडपट्टीचे स्थलांतर करण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. त्यामुळे जुना पूल पाडण्याचे काम आत्तापर्यंत 50 टक्केच झाले आहे. पूल पाडण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन पूल वाहतुकीसाठी खुला होण्यास एक वर्षाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे आणखी सव्वा ते दीड वर्ष कोरेगाव पार्क भागात ये-जा करणार्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.
साधू वासवानी पुलास 50 वर्षांहून अधिक वर्षे झाली आहेत. हा पूल अवजड वाहतुकीसाठी धोकादायक असल्याच्या अहवालानंतर महापालिकेने हा पूल पाडून तिथे नवीन पूल बांधणीचा निर्णय घेतला. यासाठी सुमारे 83 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात वीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हे काम एस. एम. सी. इन्फ्रा या कंपनीला देण्यात आले असून, दोन वर्षांत काम पूर्ण करण्यात येणार आहे. सदर पूल हा रेल्वे मार्गावर उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात रेल्वे प्रशासनालाही आराखडा पाठविण्यात आला होता. अस्तित्वात असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या खाली मध्यभागी खांब आहे. रेल्वे प्रशासनाने नवीन उड्डाणपुलाचे काम करताना खांब उभारू नये, अशी सूचना केली होती. त्यासाठी ओपन वेब गर्डर या पद्धतीचा वापर केला जाणार आहे. या पुलाची लांबी 54 मीटर असून, त्याची बांधणी रेल्वे प्रशासनाच्या सूचनेनुसार केली जाणार आहे.
दरम्यान, जुलैमध्ये जुना पूल पाडण्यास सुरुवात केली आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाकडून ब्लॉक घेण्यात येत आहे. पुणे ते मिरज या मार्गावर आणि पुणे ते हडपसर अशा या दोन मार्गांवर दररोज दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येतो. आत्तापर्यंत कोरेगाव पार्कच्या बाजूकडील जुना उड्डाणपूल पाडण्यात आला आहे. तेथे कॉलमचे कामही सुरू करण्यात आले आहे.
एकीकडे रेल्वेकडून ब्लॉक जाहीर केला असला, तरी या उड्डाणपुलाखाली असलेल्या झोपडपट्टीमध्ये सर्किट हाऊसकडील बाजूचा पूल पाडता येत नाही. या ठिकाणी शंभर झोपडीधारक आहेत. यांपैकी 60 जणांनी स्थलांतरित होण्याची तयारी दाखविली आहे. त्यानुसार त्यांचे हडपसर येथे पुनर्वसन केले जाणार आहे. जोपर्यंत या नागरिकांचे स्थलांतर होत नाही, तोपर्यंत येथील पूल पाडता येणार नाही. येथील पूल पाडल्यानंतर पुढील एका वर्षात नवीन पुलाचे काम केले जाणार आहे. त्यामुळे झोपडपट्टीचे स्थलांतर केव्हा होणार, यावर नवीन पूल केव्हा खुला होणार, हे ठरणार आहे.