

सुषमा नेहरकर-शिंदे
राजगुरुनगर: गेल्या काही महिन्यांत पशुखाद्याचे दर दुपटीने वाढल्याने पशुपालन व दुग्धव्यवसाय अडचणीत आला आहे. पशुखाद्य दरवाढीने शेतकर्याचे कंबरडे मोडले असून, पशुधन विकलेले बरे पण दूध व्यवसाय नको अशी म्हणण्याची वेळ सध्या शेतकर्यांवर आली आहे.
गेल्या काही वर्षांत शेतीला जोडधंदा म्हणून शेतकर्यांकडून दूध व्यवसाय वाढविण्यास सुरुवात झाली. घराचा मुबलक चारा आणि मनुष्यबळ असल्याने हा दूध धंदा परवडत होता. परंतु आता घरच्या मनुष्यबळाचा अभाव व गावागावांतील गायरानांची कमी झालेली संख्या यामुळे विकतच्या पशुखाद्याची मागणी वाढली आहे.
सध्या बाजारामध्ये एक किलो पशुखाद्य 30 ते 32 रुपये किलो दराने मिळत आहे. तर शेतकर्याला दुधाला मिळणारा दरदेखील तेवढाच आहे. त्यामुळे इतर खर्च लक्षात घेता दुधाला मिळणारा दर खर्चाच्या तुलनेत खूपच कमी असून शेतकर्याला दूध व्यवसाय करणे प्रचंड अडचणीचे झाले आहे.
दुधाचे दर लिटरमागे 1 रुपया 80 पैसे या प्रमाणात वाढविले जातात. दुधाचे दर वाढले की पशुखाद्याचे दर 200, 300 रुपयांच्या पटीत वाढविले जातात. गेल्या काही वर्षांत पुशखाद्य, चार्याचा खर्च शेतकर्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. सध्या शेतकर्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी याकडे लक्ष देण्यास कुणालाही वेळ नाही. शासनाकडून योजना आणल्या जातात, पण जाचक अटींमुळे खरे गरजू शेतकरी लाभापासून वंचितच राहतात. आता शेतकर्यांना दूध व्यवसाय करणे कठीण झाले आहे.
- पांडुरंग बाबूराव शिंदे, शेतकरी, पशुपालक, खेड
पशुखाद्याचे दर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाढतात, परंतु त्यावेळी शेतकर्यांकडे शेतातील हिरवा चारा मुबलक प्रमाणात असतो. विकतच्या पशुखाद्याला मागणी कमी असते. परंतु सध्या पशुखाद्याचे दर कमी झाले असले तरी शेतकर्यांना पशुखाद्य खरेदी करणे आवाक्याबाहेर गेले आहे. परंतु दुधाला फॅट यायची असेल तर विकतचे पशुखाद्य घेतल्याशिवाय पर्याय नाही. यामुळेच दर कमी होऊनदेखील शेतकर्यांना पशुखाद्य खरेदी करणे परवडत नाही.
- वैभव खुटवड, पशुखाद्यविक्रेते, खेड